Rahul Gandhi : राहुल गांधींच्या लोकसभेतील ‘त्या’ विधानांनी उद्धव ठाकरेंची झाली अडचण

मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे त्यांच्याच मित्रपक्षांच्या निशाण्यावर आहेत. शनिवारी लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर अर्थात वीर सावरकर यांच्या लेखाचा हवाला देत मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
राहुल गांधींनी सावरकरांचा उल्लेख केला आणि म्हणाले की, सावरकरांनी लिहिले होते की भारतीय राज्यघटनेची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्यात भारतीय काहीही नाही. वेदांनंतर, मनुस्मृती हा धर्मग्रंथ आहे जो आपल्या हिंदू राष्ट्राला सर्वात जास्त पूज्य आहे आणि तो प्राचीन काळापासून आपली संस्कृती, चालीरीती, विचार आणि वर्तनाचा आधार राहिला आहे. आज मनुस्मृती कायदा आहे. सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी मानहानीच्या खटल्याचा सामना करत असलेले राहुल गांधी जे काही बोलले ते भाजपवर हल्लाबोल करत बोलले. मात्र यामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणीत त्यांनी वाढ केली.
महाराष्ट्रात भाजपपाठोपाठ शिवसेनेचे दोन्हीगट वीर सावरकरांना नायक मानतात. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या हल्ल्याला उद्धव ठाकरे कसे सामोरे जातील, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात उद्धव ठाकरेंनी वेगळा मार्ग पत्करला तर नवल वाटायला नको. नुकतेच वीर सावरकर यांचा फोटो कर्नाटक विधानसभेतून हटवण्याच्या तयारीशी संबंधित बाबी समोर आल्यावर, लोकसभेत राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर भाजपने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.
वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यासंदर्भात १५ डिसेंबरला मुंबईत मोठी पत्रकार परिषद बोलावली आहे. साहजिकच हे प्रकरण आता थांबणार नाही. या सगळ्यात उद्धव ठाकरेंचा पक्ष काय भूमिका घेतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कारण विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव पत्करून उद्धव ठाकरे हिंदुत्वाकडे परतले आहेत. त्यानंतर अशा स्थितीत काँग्रेससोबत दीर्घकाळ राहणे त्यांना कठीण जाईल, कारण राज्यात त्यांची स्पर्धा आता भाजपशी नसून त्यांच्याच पक्षातील अन्य गटांशी आहे.





