EVM विरोधात राहुल गांधींचा लाँग मार्च: मारकडवाडीतून होणार सुरू…

मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधक राज्यभरात ईव्हीएमवर आक्षेप नोंदवताना दिसत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी सोलापुरातील मारकडवाडीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान करण्याचा निर्णय गावक-यांनी घेतला होता. मात्र प्रशासनाकडून ही मागणी फेटाळण्यात आली. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी हे मारकडवाडीतून ईव्हीएम विरोधात लाँग मार्च काढणार आहेत.
सोलापुरातील माळशिरसमध्ये मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. या घटनेने राज्यसह देशभरात मारकडवाडी चर्चेचा विषय ठरले होते. ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदारांनी सहकार्य करावे, अशी विनंती मारकडवाडीचे सरपंच व्ही. जी. मारकड यांनी केली होती. मात्र ही मागणी प्रशासनाने फेटाळली होती. यानंतर माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी बॅलेट पेपरवरील मतदान करण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले.
यानतंर आता सोलापुरातील मारकडवाडीतून एक मोठा लाँग मार्च काढला जाणार आहे. हा लाँग मार्च ईव्हीएम विरोधात असणार आहे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थितीत राहणार आहेत, अशी माहिती शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी सोलापुरात महाविकास आघाडीकडून ईव्हीएम मशीन फोडून जाळत आंदोलन करण्यात आले. यावेळी सोलापुरातील ईव्हीएम विरोधी कृती समितीने आंदोलनाची हाक दिली होती. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेतेही आंदोलनात सहभागी झाले होते.
वंचितकडूनही जनआंदोलनाची हाक –
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानुसार १६ डिसेंबरपर्यंत राज्यात ईव्हीएमविरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.





