राहुल गांधी आसाममधील पूरग्रस्तांची घेणार भेट; मणिपूरलाही होणार रवाना

Assam Flood | आसामला मुसळधार पावसाने झोडपले आहे. आसाममधील 29 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे 24 लाख लोकांना याचा फटका बसला आहे. यात आतापर्यंत 78 जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यातील अनेक प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नागरिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी सोमवारी आसाममधील पूरग्रस्तांची भेट घेणार आहेत.
राहुल गांधी आज मणिपूर दौऱ्यावर
राहुल गांधी आज मणिपूर दौऱ्यावर जाणार आसून त्यापूर्वी ते आसाममधील कछार जिल्ह्यातील सिलचर येथील कुंभीग्राम विमानतळावर पोहोचतील. येथून राहुल लखीपूर येथील पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या शिबिरात जाऊन तेथील लोकांची परिस्थिती जाणून घेणार आहेत. त्यानंतर राहुल गांधी मणिपूरमधील जिरीबाम येथे पोहोचतील.
आसाममध्ये गेल्या २४ तासांत आठ जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासांत आणखी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बुलेटिनमध्ये, धुबरी आणि नलबारी येथे प्रत्येकी दोन मृत्यू, कछार, गोलपारा, धेमाजी आणि शिवसागर येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं.
29 जिल्ह्यांतील एकूण 23 लाख 96 हजार 648 लोकांना पुराचा फटका बसला आहे. तर 68 हजार 768.5 हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. सर्वाधिक बाधित जिल्ह्यांमध्ये धुबरी यांचा समावेश आहे, जिथे 7 लाख 97 हजार 918 लोकांना या पावसाचा फटका बसला आहे.
राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
आसाममधील पूरस्थितीबद्दल राहुल गांधी यांनी शनिवारी चिंता व्यक्त केला होती. आसाममधील पूरस्थिती दिवसेंदिवस धोकादायक बनत असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच त्यांनी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना बचाव आणि पुनर्वसन कार्यात मदत करण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान, राहुल गांधी यांनी याआधी हाथरस चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. तसेच गुजरातमधील मोरबी अपघात आणि राजकोट गेमिंग झोन अपघातातील पीडितांना भेटण्यासाठी अहमदाबादला गेले होते. यानंतर आज ते आसाममधील पूरग्रस्तांची भेट घेणार आहे. त्यानंतर ते माणिपूरला देखील भेट देणार आहेत.
हेही वाचा:





