Rahul Gandhi : हे आंदोलन भारतीय विद्यार्थ्यांकडून सरकारला दिलेला इशारा; राहुल गांधी यांची टीका
हे आंदोलन भारतीय विद्यार्थ्यांकडून सरकारला दिलेला इशारा आहे, असा हल्लाबोल लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

Rahul Gandhi : केंद्र सरकारने शिक्षण प्रणाली पोकळ केली असून धर्मेंद्र प्रधान यांना जावेच लागणार होते. ते भ्रष्टाचाराचे प्रतीक आहेत. देशाची शिक्षण व्यवस्था पोखरली गेली आहे. यात जेवढी चूक पंतप्रधानांची आहे, तेवढीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे. हे आंदोलन भारतीय विद्यार्थ्यांकडून सरकारला दिलेला इशारा आहे, असा हल्लाबोल लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारवर केला आहे.
राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, विद्यार्थ्यांनी इशारा दिला की, तुम्ही ज्या पद्धतीने भारत चालवत आहात, त्या पद्धतीने तुम्ही भारत चालवू शकत नाही. ही तुमची वैयक्तिक जहागीर नाही. ही तुमची मालमत्ता नाही. हा देश भारताच्या लोकांचा आहे. तो भारताच्या संविधानाचा आहे.
या सर्व संस्था तुमच्या मालकीच्या नाहीत. जर तुम्ही याच मार्गावर चालत राहिलात, तर आता जे घडले आहे ते दहापट अधिक प्रमाणात घडताना तुम्ही पाहाल, हाच मुख्य संदेश आहे.आमच्या विद्यार्थ्यांवरील हिंसाचारासाठी आम्ही अमित शहा यांना थेट जबाबदार धरतो. आमच्या विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश त्यांनीच दिले होते.
आमच्या विद्यार्थ्यांविरुद्ध पेलेट गनसह प्राणघातक शस्त्रांचा वापर करण्यास त्यांनीच परवानगी दिली होती. हा आमच्यासाठी एक मूलभूत मुद्दा आहे. भारताच्या भविष्यावर आपल्याच सैन्याने गोळीबार करणे आम्ही सहन करणार नाही. हा संसदेत एक मोठा मुद्दा असेल, असे म्हणत त्यांनी अमित शहांवर निशाणा साधला.
दरम्यान, याआधीही त्यांनी एक व्हिडीओ जारी करत विद्यार्थ्यांचे (Rahul Gandhi) कौतुक केले. ज्या विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी रस्त्यावर उतरून लोकशाहीसाठी लढा दिला, देशाच्या भविष्यासाठी संघर्ष केला. आपल्या संविधानाचे रक्षण केले, त्या प्रत्येकाचे मी अभिनंदन करतो. मला तुमचा अत्यंत अभिमान वाटतो. हा फक्त विद्यार्थ्यांचा विजय नसून अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकासाठी शेतकरी, कामगार आणि पीडितांसाठी एक मोठा संदेश आहे.






