Rahul Gandhi : बिहारमधील क्रांती देशभर पोहचेल; राहुल गांधीनी व्यक्त केला विश्वास

बिहार : निवडणुकांमध्ये एकही मत चोरीला जाऊ नये या उद्देशातून आम्ही मतदार अधिकार यात्रा काढली. यात्रेला एखाद्या क्रांतीचे स्वरूप प्राप्त झाले. बिहारमध्ये उदयास आलेली क्रांती देशभर पोहचेल, असा विश्वास कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी व्यक्त केला. निवडणुकांमध्ये अनियमितता, मतचोरी घडत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. अशात बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीच्या तोंडावर त्या राज्यात मतदार याद्यांची पडताळणी हाती घेण्यात आली. ती प्रक्रिया म्हणजे मोठ्या संख्येने मतदारांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला.
संबंधित प्रक्रियेच्या निषेधासाठी विरोधकांच्या इंडिया आघाडीने यात्रेचा मार्ग अवलंबला. त्या यात्रेचे नेतृत्व राहुल आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी स्वीकारले. यात्रेचा भाग म्हणून आरामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी बोलताना राहुल यांनी मतदार याद्या पडताळणीवरून मोदी सरकारला लक्ष्य केले. ती प्रक्रिया म्हणजे राज्यघटना आणि लोकशाही व्यवस्थेवरील घाला आहे. बिहारच्या भूमीत अनेक क्रांतींचा जन्म झाला. आमच्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. ते पाहता बिहारमध्ये आणखी एक क्रांती उदयास आल्याचे स्पष्ट होते, असे त्यांनी म्हटले.
महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्यांत मतचोरी करण्यात मोदी सरकारला यश आले. मात्र, भाजप आणि निवडणूक आयोगाला आम्ही बिहारमध्ये तसे करू देणार नाही. मतदान हा सामान्य जनतेचा अधिकार आहे. मात्र, निवडणुका जिंकण्यासाठी मतांची चोरी केली जात आहे. देशाच्या राज्यघटनेने मताधिकाराची हमी दिली आहे, अशी भूमिकाही राहुल यांनी मांडली. इंडिया आघाडीच्या बिहारमधील यात्रेचा प्रारंभ १७ ऑगस्टला झाला. त्या यात्रेची सांगता १ सप्टेंबरला होणार आहे.





