Rahul Gandhi : युती सरकारने बिहारला गुन्हेगारीची राजधानी बनवलं; राहुल गांधी यांची टीका

नवी दिल्ली : नितीश कुमार आणि भाजपच्या युती सरकारने बिहारला भारताची गुन्हेगारीची राजधानी बनवले आहे. आज बिहार लूट, गोळ्या आणि खूनांच्या सावलीत जगत आहे. येथे गुन्हेगारी ही एक नवीन सामान्य गोष्ट बनली आहे आणि सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. बिहारच्या बंधू आणि भगिनींनो, हा अन्याय आता सहन केला जाऊ शकत नाही. जे सरकार तुमच्या मुलांचे रक्षण करू शकत नाही ते तुमच्या भविष्याची जबाबदारीही घेऊ शकत नाही, असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि ज्येष्ठ काॅंग्रेस नेते राहुल गांधी म्हटले आहे.
पाटण्यातील मोठे उद्योगपती गोपाल खेमका यांच्या हत्येनंतर बिहारची कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यावर गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली. या पूर्वी, तेजस्वी यादव यांनी खेमका यांच्या हत्येवरून सरकारवर निशाणा साधला होता आणि बिहारवर जंगलराजचा आरोप केला होता. राहुल गांधी म्हणाले की, आता नवीन बिहारची वेळ आली आहे. प्रत्येक खून, प्रत्येक लूट, प्रत्येक गोळी – बदलाची हाक आहे. आता नवीन बिहारची वेळ आली आहे, जिथे प्रगती आहे, भीती नाही. यावेळी मतदान फक्त सरकार बदलण्यासाठी नाही तर बिहार वाचवण्यासाठी आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा, बिहारची राजधानी पाटणा येथे गुन्हेगारांनी मोठ्या उद्योगपती गोपाळ खेमका यांची गोळ्या घालून हत्या केली. खेमका हे पाटण्यातील एक प्रसिद्ध उद्योगपती होते. खेमका यांचा मुलगा गुंजन याचीही सहा वर्षांपूर्वी वैशालीच्या औद्योगिक पोलीस ठाण्याच्या परिसरात हत्या करण्यात आली होती.
हे तर खरे जंगलराज – तेजस्वी
गोपाल खेमका यांचा व्यापारी वर्गात खूप प्रभाव होता. त्यांच्या हत्येमुळे बिहारचा व्यापारी वर्ग हादरला आहे. त्यांच्या हत्येने बिहारचे राजकारणही तापले आहे. राजद नेते तेजस्वी यादव यांनीही लिहिले आहे की, पोलिस स्टेशनपासून काही पावलांच्या अंतरावर असलेल्या पाटण्यात बिहारच्या एका मोठ्या उद्योगपतीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बिहारमध्ये दर महिन्याला शेकडो व्यापाऱ्यांची हत्या होत आहे. पण आपण याला जंगलराज म्हणू शकत नाही का? कारण धर्मग्रंथांमध्ये यालाच मीडिया मॅनेजमेंट, पर्सेप्शन मॅनेजमेंट आणि इमेज मॅनेजमेंट म्हणतात.





