Chhatron Ki Goonj Pune : तरुणीने स्टेजवर जे सांगितलं ते ऐकून राहुल गांधी स्तब्ध; पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद

Chhatron Ki Goonj Pune : राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना महिला स्वातंत्र्य, शिक्षण, आर्थिक हक्क आणि पुरुषप्रधान मानसिकतेवर भाष्य केले. 8% महिलांकडे स्वतःची मालमत्ता असल्याचा दावा केला.

Updated On:

Chhatron Ki Goonj Pune :  ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी विद्यार्थिनींशी संवाद साधत महिला स्वातंत्र्य, पुरुषप्रधान मानसिकता, शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि महिलांवरील हिंसाचाराच्या मुद्द्यांवर भाष्य केले. या कार्यक्रमासाठी केवळ विद्यार्थिनींना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थिनींनीही आपल्या अडचणी आणि अनुभव राहुल गांधी यांच्यासमोर मांडले.

राहुल गांधी म्हणाले, “देशातील मुली स्वतंत्र असणे महत्त्वाचे आहे. तुमचे तुमच्या वडिलांशी, पतीशी आणि मुलाशी नाते असते; मात्र तुमची ओळख त्यांच्यासोबत नाही. तुमची स्वतःची ओळख आहे.” महिलांना पत्नी, मुलगी आणि आई या तीनच चौकटींत पाहण्याची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

‘महिलांवरील हिंसाचाराचे तीन प्रकार’ –

महिलांवरील हिंसाचाराचे जन्मावेळी हत्या, शारीरिक छळ आणि आर्थिक निर्बंध असे तीन प्रकार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. महिलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हिंसा, अपमान-अनादर, वेळ आणि आर्थिक नियंत्रण अशा पद्धतींचा वापर केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राहुल गांधी यांनी मनुस्मृतीचा संदर्भ देत महिलांना वडील, पती आणि मुलांची मालमत्ता मानण्याची मानसिकता लज्जास्पद असल्याचे म्हटले. “महिला स्वतंत्र असल्या पाहिजेत. त्या कोणावरही अवलंबून नाहीत,” असे ते म्हणाले.

‘8% महिलांकडे स्वतःची मालमत्ता’

राहुल गांधी यांनी देशातील महिलांच्या स्थितीशी संबंधित काही आकडेवारी मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, 60 टक्के मुली एकट्या घराबाहेर पडू शकत नाहीत, तर 45 टक्के मुली लग्न किंवा घरकामामुळे शिक्षण सोडतात. तसेच देशातील केवळ 8 टक्के महिलांकडे स्वतःच्या मालकीची मालमत्ता असल्याचा दावा त्यांनी केला.

“मुलगा अनेक परीक्षा देऊ शकतो; मात्र मुलीला लग्नाचे वय झाले म्हणून पुढे शिक्षण घेऊ नये, असे सांगितले जाते. मुलगा उशिरापर्यंत बाहेर राहू शकतो, पण मुलीवर वेळेचे बंधन असते,” असे राहुल गांधी म्हणाले.

‘मुलांनी गैरवर्तन करणे ठीक, पण मुलींनी नाही?’

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्यांच्या क्लिप्स सादर करत ‘मनुस्मृती परत आली आहे’ असा संदर्भ दिला. जंतर-मंतरवरील घटनेचा उल्लेख करत त्यांनी, मुलांनी गैरवर्तन केल्यास तेवढा सांस्कृतिक धक्का बसत नाही; मात्र मुलींनी गैरवर्तन केल्याचे ऐकून धक्का बसतो, अशी मानसिकता असल्याची टीका केली.

“मुलांनी गैरवर्तन करणे ठीक आहे, पण मुलीने गैरवर्तन करणे स्वीकारार्ह नाही, अशी मानसिकता आहे. ही मनुस्मृतीची मानसिकता आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.

विद्यार्थिनीने सांगितला छळाचा अनुभव –

एका विद्यार्थिनीने सांगितले की, 13 वर्षांची असताना काही लोकांनी तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. मोठी झाल्यानंतरही असाच प्रकार घडला. यावेळी तिने संबंधितांना प्रतिकार केला; मात्र अशा प्रसंगी मदतीला कोणीही येत नसल्याची खंत तिने व्यक्त केली. ही आपबीती ऐकून राहुल गांधी स्तब्ध झाले.

दुसऱ्या विद्यार्थिनीने ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला खेळाडूंना कथित गैरवर्तन करणाऱ्यांपासून मिळालेल्या वागणुकीचा मुद्दा उपस्थित करत, “मी तर सामान्य मुलगी आहे; अजून किती काळ लढायचे?” असा सवाल केला.

‘पुरुषाला स्त्रीवर नियंत्रण का ठेवायचे असते?’

राहुल गांधी यांनी एका विद्यार्थिनीला पुरुष स्त्रीवर नियंत्रण का ठेवू इच्छितो, असा प्रश्न विचारला. त्यावर विद्यार्थिनीने, “मी स्वतःकडे पाहते तेव्हा मला जाणीव होते की मी एक माणूस आहे. लोक मला ‘तू एक स्त्री आहेस’ असे म्हणतात, तेव्हा मला राग येतो,” असे उत्तर दिले.

एका विद्यार्थिनीने कुटुंबातील संपत्तीतील हक्काचा मुद्दाही मांडला. राहुल गांधी म्हणाले, “तुझा भाऊ वाटा मागतो, त्याला हक्क म्हणतात. तू वाटा मागतेस, त्याला हिस्सा म्हणतात.” संबंधित विद्यार्थिनीने नोकरीसोबत घरकाम, स्वयंपाक आणि मुलांची जबाबदारी महिलांकडून अपेक्षित असल्याचे सांगितले.

MPSC पेपरफुटीचा मुद्दाही उपस्थित

एका विद्यार्थिनीने MPSC परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप करत, “आम्हाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. कृपया आम्हाला मदत करा,” अशी मागणी केली. त्यावर राहुल गांधी यांनी पुन्हा महिलांना दडपणाऱ्या मानसिकतेचा मुद्दा मांडला.

नेहा राठोड यांनी मांडला FIRचा मुद्दा

भोजपुरी गायिका नेहा राठोड यांनीही कार्यक्रमात सरकारला प्रश्न विचारल्यास FIR दाखल होत असल्याचा दावा केला. त्या म्हणाल्या की, सरकारला प्रश्न विचारल्यामुळे त्यांना अनेक प्रश्न आणि FIRचा सामना करावा लागला. लग्नानंतर त्यांनी ‘काबा इन यूपी’ हे गाणे गायले होते. त्यानंतर पोलीस घरी आल्याने सासरच्या मंडळींनीही त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांना वेगळ्या पद्धतीने ट्रोल केले जाते आणि त्यांच्या चारित्र्यावर थेट प्रश्न उपस्थित केले जातात, अशी खंत राठोड यांनी व्यक्त केली. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले, “मलाही अनेक वर्षांपासून शिव्या खाव्या लागत आहेत आणि माझ्यातही काही सुधारणा झालेली नाही.”

‘बी लाउड, बी प्राउड अँड फाइट फॉर योरसेल्फ’

राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींना, “बी लाउड, बी प्राउड अँड फाइट फॉर योरसेल्फ,” असा संदेश दिला. महिलांना भीती, पुरुषप्रधानता आणि सामाजिक बंधनांमधून बाहेर पडण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

“तुम्ही या देशाचा पाया आहात, तुम्ही भविष्य आहात. पुरुषप्रधानता तुम्हाला घाबरवत असेल, दडपत असेल आणि नियंत्रित करत असेल, तर आपण सर्वांनी मिळून ती संपवली पाहिजे,” असे राहुल गांधी म्हणाले.

‘भारताची ताकद 70 कोटी महिलांच्या स्वप्नांत’

राहुल गांधी म्हणाले की, भारताची खरी ताकद केवळ सैन्यात किंवा इतर संस्थांमध्ये नसून देशातील महिलांच्या स्वप्नांमध्ये आणि विचारांमध्ये आहे. “70 कोटी लोकांची स्वप्ने आणि विचार हीच भारताची ताकद आहे,” असे त्यांनी म्हटले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि संवादादरम्यान विद्यार्थिनींकडून ‘राहुल-राहुल’च्या घोषणा देण्यात आल्या. “मी आज इथे राजकारणावर बोलायला आलेलो नाही. तुम्हाला काय वाटते आणि तुम्हाला काय हवे आहे, याबद्दल तुम्ही बोला. आपण त्यावर चर्चा करू,” असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरु असलेल्या उपोषणाला राहुल गांधी भेट देणार? विद्यार्थिनीने मांडली व्यथा

2026-08-22 20:33:14

Rahul Gandhi : पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरु असलेल्या उपोषणाला राहुल गांधी भेट देणार? विद्यार्थिनीने मांडली व्यथा

Rahul Gandhi In Pune : राहुल गांधींचा पुण्यात विद्यार्थिनींशी संवाद, म्हणाले- ‘70 कोटी महिलांची स्वप्ने हीच भारताची ताकद’

2026-08-22 20:22:25

Rahul Gandhi In Pune : राहुल गांधींचा पुण्यात विद्यार्थिनींशी संवाद, म्हणाले- ‘70 कोटी महिलांची स्वप्ने हीच भारताची ताकद’

Maharashtra Politics : ठाकरेंसह शरद पवारांना मोठा धक्का ! 'या' बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

2026-08-22 18:47:41

Maharashtra Politics : ठाकरेंसह शरद पवारांना मोठा धक्का ! 'या' बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

V. D. Satheesan : मंगळुरू हस्तांतरणाला केरळम सरकारचा विरोध; मुख्यमंत्री सतीसन यांची केंद्राकडे पुनर्विचाराची मागणी

2026-08-22 17:38:11

V. D. Satheesan : मंगळुरू हस्तांतरणाला केरळम सरकारचा विरोध; मुख्यमंत्री सतीसन यांची केंद्राकडे पुनर्विचाराची मागणी

BJP Gen Z Outreach : तरुण मतदारांसाठी भाजपची खास टीम; स्मृती इराणी, विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी

2026-08-22 15:52:11

BJP Gen Z Outreach : तरुण मतदारांसाठी भाजपची खास टीम; स्मृती इराणी, विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी
Chhatron Ki Goonj Pune : तरुणीने स्टेजवर जे सांगितलं ते ऐकून राहुल गांधी स्तब्ध; पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद - Dainik Prabhat