V. D. Satheesan : मंगळुरू हस्तांतरणाला केरळम सरकारचा विरोध; मुख्यमंत्री सतीसन यांची केंद्राकडे पुनर्विचाराची मागणी
राज्य सरकारशी कोणतीही पूर्वचर्चा न करता निर्णय घेण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री सतीसन (V. D. Satheesan) यांनी केला.

V. D. Satheesan : मंगळुरूचा काही भाग पालक्काड रेल्वे विभागातून म्हैसूर विभागात हलवण्याच्या रेल्वे बोर्डाच्या निर्णयाला केरळ सरकारने विरोध केला आहे. हा निर्णय एकतर्फी असून त्याचा तातडीने पुनर्विचार करण्यासाठी केंद्र सरकारकडे दाद मागणार असल्याचे केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीसन (V. D. Satheesan) यांनी शनिवारी सांगितले.
राज्य सरकारशी कोणतीही पूर्वचर्चा न करता निर्णय घेण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री सतीसन (V. D. Satheesan) यांनी केला. मंगळुरू जंक्शनसारखा महत्त्वाचा भाग पालक्काड विभागातून वगळल्यास महसूल आणि भविष्यातील विकासावर विपरीत परिणाम होईल, असे त्यांनी म्हटले.
उल्लाल ते मंगळुरू हा भाग दक्षिण रेल्वेकडून दक्षिण-पश्चिम रेल्वेकडे हस्तांतरित केल्यास केरळ आणि पालक्काड विभागाचे मोठे नुकसान होईल, असा दावा त्यांनी केला. या निर्णयाविरोधात पंतप्रधान आणि केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठवून राज्यातील खासदारांच्या मदतीने केंद्रावर दबाव आणला जाईल, असे सतीसन (V. D. Satheesan) यांनी सांगितले.
काँग्रेसचे कासारगोडचे खासदार राजमोहन उन्नीथन आणि पालक्काडचे खासदार व्ही. के. श्रीकंदन यांनीही निर्णयावर टीका केली. पालक्काड विभागाचा महसूल आणि निधी कमी करून तो कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप श्रीकंदन यांनी केला. मंगळुरूचा भाग गेल्यास पालक्काड विभागाला महसुलाचा मोठा फटका बसेल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होऊ शकतो, अशी चिंता काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली.






