Eknath Shinde : राहुल गांधी यांनी देशातील 140 कोटी जनतेची माफी मागावी; एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
Eknath Shinde : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यांवर आक्षेप घेत त्यांनी थेट माफीची मागणी केली आहे.

Eknath Shinde criticizes Rahul Gandhi : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यांवर आक्षेप घेत त्यांनी थेट माफीची मागणी केली आहे.
‘ही कुठली भाषा, ही कुठली संस्कृती?’
एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविषयी वापरल्या जाणाऱ्या भाषेवर आक्षेप घेतला. ते म्हणाले की, राजकीय विरोध असू शकतो; मात्र देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या पंतप्रधानांविषयी बोलताना भाषेचं भान राखणं आवश्यक आहे.
“मोदीजींना, अमित भाईंना वाटेल ते बोलले, शिव्या दिल्या, आरोप केले. दिल्ली पोलिसांना देखील ‘दिल्ली के गली के गुंड’ म्हणाले. अरे, तुम्हाला व्यक्तीबद्दल द्वेष असू शकतो; पण प्रधानमंत्री हे या देशाचं प्रमुख पद आहे. खालच्या पातळीवर जाऊन आरोप करता, ही कुठली भाषा, ही कुठली संस्कृती?” असे सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केले. तसेच, अशा वक्तव्यांमुळे देश अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही केला.
‘मोदीजींना ३६ देशांनी सर्वोच्च पुरस्कारांनी गौरवलं’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध देशांकडून मिळालेल्या सन्मानांचा उल्लेख करत एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. मोदी यांना ३६ देशांनी सर्वोच्च पुरस्कारांनी गौरवले आहे. “ तुमच्या पोटात का दुखतंय?” असे म्हणत संताप व्यक्त केला.
न्यायव्यवस्थेचा अपमान झाल्याचा शिंदेंचा आरोप
निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी याचिका दाखल करण्यासंदर्भात विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेवरही एकनाथ शिंदे यांनी टीका केली. मोर्चा काढून याचिका दाखल करण्याच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी याला सर्वोच्च न्यायव्यवस्थेवरील हल्ला आणि न्यायव्यवस्थेचा अपमान असल्याचे म्हटले.
या संपूर्ण प्रकरणाचा निषेध करत राहुल गांधी यांनी देशातील १४० कोटी जनतेची माफी मागावी, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली.
दरम्यान, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू झालेला हा राजकीय संघर्ष आता सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे अधिक तीव्र झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या टीकेवर महाविकास आघाडीतील नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






