…म्हणून राहुल गांधी म्हणाले ‘मोदी है तो मुमकिन है’

नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज ‘मोदी है तो मुमकिन है’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोरोना महासाथीमुळे देशाचा जीडीपी स्वातंत्र्योत्तर काळातील तळ गाठेल अशी भीती इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्थी यांनी सोमवारी व्यक्त केली होती. मूर्थी यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले.
२०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने ‘मोदी है तो मुमकिन है’ असा नारा देत प्रचार केला होता. याचाच उपयोग करून आता राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
याबाबत ट्विट करताना राहुल गांधी यांनी, ‘मोदी है तो मुमकिन है’ असा संदेश लिहला असून याबरोबरच मूर्थी यांच्या जीडीपीबाबतच्या वक्तव्याचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे.
तत्पूर्वी मूर्थी यांनी देशाच्या जीडीपीबाबत चिंता व्यक्त करताना कोरोना महासाथीमुळे देशाचा जीडीपी १९४७ नंतरचा नीचांक गाठेल असं म्हंटल होत.
“जगाचा जीडीपी कोसळला आहे. जागतिक व्यवसाय आकुंचित पावतोय. आंतरराष्ट्रीय वाहतूक जवळपास बंद पडली आहे. या सर्वांमुळे जगाचा जीडीपी ५ ते १० टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.” असं नारायण मूर्थी म्हणाले होते.
दरम्यान, राहुल गांधी अर्थव्यवस्था व चीनने दाखवलेल्या आक्रमकतेवरून मोदी सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत.
मोदी है तो मुमकिन है। pic.twitter.com/V1fS7nStIt
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 12, 2020





