Rahul Gandhi : ‘मतांसाठी पंतप्रधान मोदी स्टेजवर नाचूही शकतात…’; राहुल गांधींचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जवळ येत असताना राजकीय वातावरण तापले आहे. एनडीए आणि महागठबंधनचे नेते एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर टीका करत आहेत. याच सिलसिलेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुजफ्फरपूर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत वादग्रस्त हल्ला चढवला. राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान मोदी मतांसाठी काहीही करू शकतात, अगदी स्टेजवर येऊन नाचूही शकतात.”
राहुल गांधीं नेमके काय म्हणाले?
राहुल गांधी यांनी भाषणात मोदींवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, “त्यांना (पीएम मोदींना) फक्त तुमचे मत हवे आहे. तुम्ही जर त्यांना सांगितले, ‘नरेंद्र मोदी, तुम्ही हे नाटक करा,’ तर ते करतील. तुम्ही जर त्यांना म्हटले की, ‘आम्ही तुम्हाला मत देऊ, तुम्ही स्टेजवर येऊन नाचा,’ तर ते स्टेजवर येऊन नाचूही शकतील.”
त्यांनी पुढे आरोप केला की, “निवडणुकीपूर्वी जे काही करून घ्यायचे आहे, ते करून घ्या. कारण, निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी तुम्हाला दिसणार नाहीत.” राहुल यांनी उपस्थितांना महागठबंधनच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करताना सांगितले, “महागठबंधनचे सरकार सर्व समाज आणि धर्मांचे सरकार असेल. बिहारला पुढे घेऊन जाणे, ही आमची प्राथमिकता आहे.”
जातीय जनगणनेचा मुद्दा पुन्हा उचलला
राहुल गांधी यांनी भाषणात जातीय जनगणनेचा मुद्दा जोरदारपणे मांडला. ते म्हणाले, “लोकसभेत आम्ही पंतप्रधानांना जातीय जनगणना करण्याची मागणी केली होती, पण त्यांनी त्यावर एक शब्दही उच्चारला नाही.” ही खंत व्यक्त करताना त्यांनी बिहारच्या जनतेचे कौतुक केले. “इथले लोक सर्वत्र दिसतील. त्यांनी दिल्ली उभी केली, बंगळुरूचे रस्ते बनवले, गुजरातमध्ये काम केले आणि मुंबईला मदत केली. फक्त हिंदुस्तानच्या रस्त्यांचीच गोष्ट सोडा, दुबईसुद्धा बिहारमधील लोकांच्या मेहनतीनेच उभे राहिले आहे.”
बिहारचे लोक इतर राज्यांमध्ये विकास घडवू शकतात, तर तेच काम ते बिहारमध्ये का करू शकत नाहीत, असा सवाल उपस्थित करत राहुल यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले, “बिहारमधील तरुण सांगतात की, त्यांना इथे रोजगार मिळत नाही. गेल्या 20 वर्षांपासून नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत. ते स्वतःला अति-मागासवर्गीय म्हणवून घेतात, पण शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रात त्यांनी काय सुधारणा केली? जिथे तुम्हाला तुमच्याच राज्यात काही मिळत नाही, असा बिहार तुम्हाला हवा आहे का?”
‘मेड इन चायना’ ते ‘मेड इन बिहार’चा नारा
राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करताना ‘मेड इन चायना’ उत्पादनांचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “तुम्ही तुमच्या मोबाईलच्या मागे बघा, त्यावर ‘मेड इन चायना’ लिहिलेले असेल. आम्हाला हे बदलायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी आणि चुकीची जीएसटी लागू करून बिहारमधील लहान व्यावसायिकांना उद्ध्वस्त केले आहे. आजूबाजूला तुम्ही जे काही पाहाल, त्यावर ‘मेड इन चायना’ लिहिलेले असेल.”
त्यांनी महागठबंधनच्या योजनांचा उल्लेख करत सांगितले, “आम्हाला आता हे बदलायचे आहे. आता प्रत्येक वस्तूवर, मग तो मोबाईल असो किंवा पॅन्ट-शर्ट, यावर ‘मेड इन बिहार’ असे लिहिलेले असावे. बिहारमधील तरुणांना रोजगार मिळावा आणि येथील कारखान्यांमध्येच सर्व वस्तू तयार व्हाव्यात.” बिहार निवडणुकीत महागठबंधन विरुद्ध एनडीए अशी थेट लढत असून, राहुल गांधींचे हे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत अशी वैयक्तिक टीका पातळी खालावल्याचे दिसत आहे.





