Rahul Gandhi : “एकलव्यासारखा जनतेचा अंगठा कापला जातोय”; राहुल गांधी यांचे मोदी सरकावर टीकास्त्र

Rahul Gandhi – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी मोदी सरकारला लक्ष्य करण्यासाठी महाभारतातील गुरू द्रोणाचार्य, एकलव्य कथेचा आधार घेतला. द्रोणाचार्यांना गुरूदक्षिणा म्हणून एकलव्याला अंगठा द्यावा लागला. त्याप्रमाणेच सरकार जनतेला अक्षम बनवण्यासाठी जनतेचा अंगठा कापतेय, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
लोकसभेतील राज्यघटनेवरील चर्चेत सहभागी होताना राहुल यांनी उपजीविका आणि कौशल्याचे प्रतीक म्हणून अंगठ्याचा उल्लेख केला. सरकार विविध क्षेत्रांत अदानी समुहासाठी मक्तेदारीची पोषक स्थिती निर्माण करत आहे. त्यामुळे छोटे व्यावसायिक, व्यापाऱ्यांचा अंगठा कापला जातो. अग्निपथ योजना, शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा, पेपरफुटी याबाबी तरूण, शेतकरी, गरिबांच्या अंगठा कापणाऱ्या आहेत, असे ते म्हणाले.
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मनुस्मृतीचे समर्थक आहेत. मात्र, देश राज्यघटनेनुसार चालेल. भाजपचे सर्वोच्च नेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राज्यघटनेऐवजी मनुस्मृतीला प्राधान्य होते. राज्यघटनेत काहीच भारतीय नसल्याचे ते म्हणत. आता भाजप राज्यघटनेच्या रक्षणाची भाषा करतो. त्यातून तो पक्ष सावरकर यांच्याच भूमिकेचा उपहास करत आहे, अशी शाब्दिक टोलेबाजी राहुल यांनी केली. राज्यघटना गरिबांचे रक्षण करते. मात्र, भाजपकडून सतत राज्यघटनेवर हल्ला सुरू असतो, असा आरोप त्यांनी केला.
देशात सध्या सामाजिक समानता नाही अन् आर्थिक समानताही नाही. राजकीय समानताही संपुष्टात आली आहे. त्यामुळेच आमचे पुढचे पाऊल जातनिहाय जनगणना असेल. सरकारने कुणाचे अंगठे कापले ते आम्हाला देशाला दाखवून द्यायचे आहे. कुणाचे अंगठे कापले ते आम्ही दलित, आदिवासी, मागासवर्गीय, शेतकरी, कामगारांना दाखवून देऊ. जातनिहाय जनगणना केली जाईल आणि आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा हटवली जाईल, या निर्धाराचा राहुल यांनी पुनरूच्चार केला.





