“ट्रम्प टॅरिफवर तुम्ही आता काय करणार?” ; लोकसभेत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, चीनवरूनही घेरले

Rahul Gandhi On China । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या सवलतीच्या परस्पर शुल्कावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी संसदेत प्रतिक्रिया दिली. यावेळी राहुल गांधींनी ट्रम्प टॅरिफवर तुम्ही आता काय करणार ? असा सरकारला थेट सवाल केला . त्यासोबतच त्यांनी चीनच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
“टॅरिफबाबत नेमके काय करणार आहे?” Rahul Gandhi On China ।
राहुल गांधी यांनी सरकारला,”अमेरिकेने भारतावर शुल्क लादले आहे, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. सरकारने आता हे सांगावे की ते टॅरिफबाबत नेमके काय करणार आहे?” असा सवाल केला. पुढे ते म्हणाले की,”आमच्या मित्र राष्ट्रांनी अचानक आमच्यावर २७ टक्के कर लादण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे आमची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होणार आहे. आपले ऑटोमोबाईल आणि औषध उद्योग संकटात आहेत.” असे त्यांनी म्हटले.
राहुल गांधी चीनबद्दल काय म्हणाले? Rahul Gandhi On China ।
लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी केवळ ट्रम्पच्या शुल्कावरच नव्हे तर चीन वादावरही आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की,”चीनने आपली जमीन बळकावली आहे. आपल्याला देशाची व्यापलेली जमीन परत मिळाली पाहिजे. सीमेवर पूर्वीसारखीच स्थिती असली पाहिजे. सरकारवर प्रश्न उपस्थित करताना राहुल म्हणाले की, “तुम्ही ४४००० चौरस किलोमीटर जमीन चीनला दिली आहे. राहुल म्हणाले की, “कोणीतरी एकदा इंदिरा गांधींना विचारले होते की परराष्ट्र धोरणात त्या डाव्या बाजूकडे झुकतील की उजव्या बाजूकडे, परंतु भाजप-आरएसएसने थेट उजव्या बाजूकडे झुकले आहे.” असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, राहुल गांधींच्या या आरोपांवर भाजप खासदार अनुराग ठाकूर,”अक्साई चीनची जमीन कोणाच्या सरकारमध्ये गेली? त्यावेळी कोणाचे सरकार सत्तेत होते? हिंदी आणि चीन भाऊ-भाऊ म्हणत राहिले आणि चीनने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. डोकलाम घटनेच्या वेळी चिनी नेत्यांसोबत चिनी सूप पीत राहिलेले नेते कोण होते? ते नेते आपल्या सैनिकांसोबत उभे राहिले नाहीत. राजीव गांधी फाउंडेशनने चिनी अधिकाऱ्यांकडून पैसे का घेतले? आम्ही चिनी सैनिकांना योग्य उत्तर दिले आहे. मोदीजींनी देशाच्या सैन्याचे मनोबल वाढवले. हे लोक फक्त राजकारण करतात.” असे म्हणत पलटवार केला.
अमेरिकेने भारतावर २७ टक्के सवलतीचा परस्पर कर लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प म्हणाले की, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अमेरिका भेट दिली होती. तो माझा खूप चांगला मित्र आहे. पण या भेटीदरम्यान मी पंतप्रधान मोदींना सांगितले की तुम्ही आमच्याशी योग्य वागणूक देत नाही आहात. भारत नेहमीच अमेरिकेकडून ५२ टक्के कर आकारतो.”असे त्यांनी म्हटले.





