Rahul Gandhi : मतचोरीविषयी मोदी एक शब्दही बोलले नाहीत; राहुल गांधी यांचा हल्लाबोल

भागलपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बिहारचा दौरा केला. मात्र, ते मतचोरीविषयी एक शब्दही बोलले नाहीत, असा शाब्दिक हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. बिहारमधील मतदार याद्या पडताळणीवरून राजकारण तापले आहे. त्या प्रक्रियेच्या माध्यमातून बिहारी जनतेच्या मतांची चोरी केली जाणार असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
कथित मतचोरीविरोधात मोहीम हाती घेत विरोधकांनी बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा सुरू केली आहे. त्या यात्रेवेळी भागलपूरमधील सभेत बोलताना राहुल यांनी मोदी, भाजप आणि निवडणूक आयोगावरील टीकेचे सत्र कायम ठेवले. मतचोरीविषयी मोदी मौन बाळगून असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. निवडणूक आयोगाशी संगनमत करून भाजप एकापाठोपाठ एक राज्यांमधील निवडणुका चोरत आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील निवडणुकांत अनियमितता घडल्या. त्याविषयीही मोदी काहीच बोलले नाहीत. ते मतांची चोरी करत असल्याचे आता संपूर्ण देशाला समजले आहे. मात्र, इंडिया आघाडी बिहारी जनतेच्या मताधिकाराची चोरी होऊ देणार नाही, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.





