Rahul Gandhi : ‘मोर्चा रोखू शकता, पण आमची इच्छाशक्ती नाही’; सुटका झाल्यानंतर राहुल गांधींचा इशारा
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान राहुल गांधींसह अनेक खासदारांना ताब्यात घेण्यात आले. सुटकेनंतर राहुल गांधी यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला.

Rahul Gandhi : मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीने बुधवारी दिल्लीतील जंतर-मंतरजवळ मोठे आंदोलन केले. या आंदोलनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक खासदार सहभागी झाले होते. पोलिसांनी राहुल गांधी आणि अन्य नेत्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
सुटकेनंतर राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून आंदोलनात सहभागी झालेल्या इंडिया आघाडीतील खासदारांचे आभार मानले. ते म्हणाले, ‘‘लोकशाहीच्या रक्षणासाठी संसदेत, रस्त्यावर आणि आज जंतर-मंतरजवळ ठामपणे उभे राहिलेल्या इंडिया आघाडीतील प्रत्येक खासदाराचे मी आभार मानतो. ते आमचा मार्च रोखू शकतात. बैठकीला परवानगी नाकारू शकतात; पण देशातील जनतेची इच्छाशक्ती ते रोखू शकत नाहीत.’’
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरू ठेवणार
राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांच्या राजीनाम्यापर्यंत विरोधकांचे आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले. ‘‘नरेंद्र मोदी आणि अमित शाह आम्हाला विरोध करण्यापासून रोखण्याशिवाय काहीही करू शकत नाहीत. ही देशातील सर्वात पवित्र गोष्ट असलेल्या लोकशाहीच्या रक्षणाची लढाई आहे,’’ असे राहुल गांधी म्हणाले. विरोधी नेत्यांना जंतर-मंतरकडे जाण्यापासून रोखण्यात आल्याबाबत त्यांनी सरकारवर टीका केली.





