Bhigwan News : गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप अडचणीत? ‘हे’ प्रकरण भोवणार?
Bhigwan News : भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मुलीने स्वतः पोलिसांसमोर हजर होत आपण स्वइच्छेने गेल्याचे सांगितले आहे.

Bhigwan News : भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, आता या प्रकरणात राजकीय वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. मुलीच्या आई आणि भावाने भिगवण पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हाही नोंदवण्यात आला.
मात्र संबंधित मुलगी पोलिसांसमोर हजर होत प्रतिज्ञापत्राद्वारे आपण स्वतःच्या इच्छेने मुलासोबत गेल्याचे स्पष्ट केले. तसेच आम्ही दोघेही एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत आई-भावाने चुकीचा गुन्हा दाखल केल्याचा दावा तिने केला.
या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देताना काही आमदारांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली. आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या विधानांबाबत तक्रारी आल्यास महिला आयोग कारवाई करेल, असा इशारा त्यांनी दिला.
चाकणकर म्हणाल्या, “18 वर्षे पूर्ण झालेल्या महिलेला तिच्या आयुष्याबाबत निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे. अशा प्रकरणांत दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल अशी विधाने टाळली पाहिजेत. कोणीही वादग्रस्त वक्तव्य केल्यास त्याची चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल.”
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ कारवाई केली असून कायद्याप्रमाणे प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे भिगवण प्रकरण आता राजकीय आणि सामाजिक पातळीवर चर्चेचा विषय ठरले आहे.




