“राहुल गांधी हे देशाचे नंबर एकचे दहशतवादी”; केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांचे विधान

Ravneet Singh Bittu VS Rahul Gandhi| | काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत शिख समुदायाबाबत केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे. यावरून आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी ‘राहुल गांधी हे देशाचे नंबर एकचे दहशतवादी आहेत. माझ्या मते, कोणाला पकडण्यात बक्षीस असायला हवे असेल तर ते राहुल गांधी यांच्यावर असले पाहिजे. ते देशाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. देशाच्या एजन्सींनी त्याच्यावर लक्ष ठेवले पाहिजे,’ असे म्हंटले आहे.
रवनीत बिट्टू नेमकं काय म्हणाले?
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या अमेरिका दौऱ्यात धार्मिक स्वातंत्र्य आणि शीख समुदायाबाबत केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्र्यांनी हे विधान केले आहे. “राहुल गांधी यांनी शिख समुदायात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. शिख समुदाय कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही तरीही या समाजात ठिणगी टाकण्याचं काम राहुल गांधींनी केलं आहे. राहुल गांधी देशातले एक नंबरचे दहशतवादी आहेत,” असे केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांनी म्हंटले.
पुढे ते म्हणाले, “राहुल गांधी हे असे पहिले भारतीय आहेत ज्यांनी देशापेक्षा जास्त काळ देशाबाहेर घालवला आहे. तिकडे त्यांचे मित्र आहेत, त्यांचं कुटुंब आहे. त्यामुळे माझं हे स्पष्ट मत आहे की राहुल गांधींना देशावर प्रेम नाही. विदेशात जाऊन भारताबाबत प्रत्येक उलट गोष्ट बोलतात. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. बाहेर जाऊन फोटो काढतात आणि त्यांची खिल्ली उडवली जाते”
“मी आव्हान देतो, जे शिख लोक इथे आहेत त्यांनी सांगावं की शिख समुदाय कुठल्या पक्षाशी जोडला गेला आहे का? त्यांना कुणीतरी सांगितलं आम्ही पगडी घालू शकत नाही, कडं वापरु शकत नाही. कुणी सांगितलं हे? कोण म्हणतंय गुरुद्वारामध्ये आम्हाला जाता येत नाही? मला एका शिख बांधवाने सांगावं मी भाजप सोडून देईन,” असे आव्हानही बिट्टू यांनी दिले.
शिख समुदायात फूट पाडण्याचं काम सुरु
“आधी मुस्लीम समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. आता शिख समुदायांत भांडणं लावण्याचा प्रयत्न होतो आहे. शिख समुदायात फूट पाडण्याचं काम सुरु आहे. शिख बांधव देशाच्या सीमेवर उभे राहून सीमेचं रक्षण करतात. अशा समुदायात फूट पाडण्याचं काम सुरु आहे. देशातले वाँटेड गुन्हेगार किंवा दहशतवादी जशी भाषा करतो तशीच भाषा राहुल गांधींच्या तोंडी आहे. राहुल गांधी एरवीही अशीच वक्तव्यं करतात. जे बॉम्ब हल्ले करतात, शस्त्रधारी दहशतवादी असतात अशा फुटीरतावाद्यांना आणि दहशतवाद्यांना राहुल गांधींचं कौतुक वाटतं आहे कारण राहुल गांधी त्यांच्याच भाषेत बोलले आहेत,” राहुल गांधींबाबत बिट्टू यांनी म्हटलं आहे.





