छत्तीसगड मधील अदिवासी नृत्य महोत्सवाचे राहुल गांधींच्या हस्ते उद्घाटन

रायपुर – समाजातील प्रत्येक घटकाचा विकास प्रक्रियेत सहभाग घेतल्याशिवाय देश चालवला जाऊ शकत नाही असे प्रतिपादन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. छत्तीसगड राज्यातर्फे रायपुरला सायन्स कॉलेजच्या मैदानावर राष्ट्रीय अदिवासी नृत्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन आज राहुल गांधी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राहुल गांधी यांनी देशातील सध्याच्या वातावरणाचा उल्लेख करून सांगितले की नागरिकत्व कायदा आणि एनआरसीच्या आधारे लोकांमध्ये भांडणे लावली जात आहेत. लोकांना एकमेकांच्या विरोधात लढवून काहीही साध्य होणार नाही असेही ते म्हणाले. आज देशापुढे शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार आणि बिघडलेली अर्थव्यवस्था या साऱ्या समस्या आहेत. त्याची साऱ्यांनाच कल्पना आहे. अशा अस्थिर वातावरणात देशातील प्रत्येक जात, प्रत्येक धर्म प्रत्येक दलित आणि अदिवासींना बरोबर घेतल्याखेरीज देशाची अर्थव्यवस्था चालवता येणार नाही. लोकांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक विकास साधल्या शिवाय कोणाचेच कल्याण होऊ शकत नाही. विविध कारणांवरून लोकांमध्ये भांडणे लावण्याचे काम थांबले पाहिजे असे आवाहनही त्यांनी मोदी सरकारला केले.
छत्तीसगड सरकारने राज्याच्या सर्व घटकांचा विचार करून कल्याणकारी योजना राबवल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या अदिवासी नृत्य महोत्सवातही आपल्या विविधतेतील एकतेची प्रचिती येईल असे ते म्हणाले. अदिवासींच्या मालाला चांगला भाव देण्याचा आणि आदिवासींच्या जमीनी त्यांना परत करण्याचा प्रयत्न बाघेल सरकार करीत आहे याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. हे सरकार लोकांचा आवाज ऐकत असल्याने राज्यातील माओवाद्यांची समस्याही कमी होत आहे असे राहुल गांधी यांनी नमूद केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री बाघेल म्हणाले की या राज्यात आदिवसींची लोकसंख्या 32 टक्के इतकी आहे.
अदिवासींच्या संस्कृतीचे जतन करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे असे ते म्हणाले. या नृत्य महोत्सवात 1300 अदिवासी कलाकारांनी आपली नाव नोंदणी केली आहे पण प्रत्यक्षात येते 1800 कलाकार सहभागी झाले आहेत. उद्घाटनानंतर राहुल गांधी, मुख्यमंत्री बाघेल आणि अन्य उपस्थितांनी अदिवासी नृत्यांमध्येही भाग घेतला.





