‘राहुल गांधींनी वारंवार व्हिएतनामला जाण्याचे कारण काय?’, परदेश दौऱ्यावरून भाजपचा सवाल

BJP On Rahul Gandhi’s Vietnam Visit | काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावरून भाजपकडून निशाणा साधण्यात आला आहे. राहुल गांधी हे सातत्याने व्हिएतनामलाच का जात आहेत? असा सवाल करत विरोधी पक्षनेत्याने भारतात जास्तीत जास्त उपलब्ध असायला हवे, असे भाजपने म्हटले आहे.
राहुल गांधी त्यांचा मतदारसंघ रायबरेलीपेक्षा व्हिएतनाममध्ये जास्त वेळ का घालवत आहेत. , ‘राहुल गांधी कुठे आहेत?’ मी ऐकलंय की ते व्हिएतनामला गेले आहेत, असे म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी त्यांच्या परदेश दौऱ्यावरून टीका केली आहे.
रविशंकर प्रसाद म्हणाले की, नवीन वर्षात राहुल गांधी आग्नेय आशियाई देशात होते आणि त्यांनी तेथे सुमारे 22 दिवस घालवले. पुन्हा एकदा ते व्हिएतनामला गेले आहेत. एवढे दिवस तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघातही घालवला नाही.
‘राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांनी भारतात उपलब्ध राहावे. व्हिएतनामबद्दलच्या त्यांच्या विलक्षण प्रेमाचे स्पष्टीकरण द्यायला. त्या देशाला त्यांचे वारंवार होणारे दौरे खूपच आश्चर्यकारक आहेत.’, असे म्हणत त्यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.
याआधीही परदेश दौऱ्यांवरून राहुल गांधींवर भाजपकडून टीका करण्यात आली होती. गेल्या वर्षी 26 डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर गांधींच्या व्हिएतनाम दौऱ्यावरूनही भाजपने टीका केली होती. भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी त्यावेळी म्हटले होते की, सिंग यांच्या निधनाने देश शोक करत असताना, राहुल गांधी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी व्हिएतनामला गेले होते.
रविशंकर प्रसाद यांच्या टीकेनंतर काँग्रेसकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी एवढे परदेश दौरे करतात. पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे, राहुल गांधींच्या दौऱ्यांपेक्षा कितीतरी अधिक आहेत., असे म्हणत कांग्रेस नेते उदित राज यांनी भाजपच्या टीकेला उत्तर दिले.





