राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी मिळेना, काँग्रेसचा मोदींवर निशाणा…

Rahul Gandhi Helicopter Stuck – झारखंडमधील गोड्डा येथे राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरला एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून परवानगी न मिळाल्यामुळे त्यांना तब्बल अर्धा तासाहून अधिक काळ मैदानात थांबावं लागलं आहे. येथील सभा आटपून पुढील कार्यक्रमासाठी निघालेल्या राहुल गांधींना या विलंबामुळे हेलिकॉप्टरमध्येच बसून राहावे लागले.
दरम्यान, या घटनेने राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केला आहे.
पीटीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी लाल रंगाच्या हेलिकॉप्टरमध्ये शांतपणे बसलेले दिसत आहेत. मैदानात त्यांच्या स्वागतासाठी मोठा जनसागर जमला आहे, पण हेलिकॉप्टरला परवानगी न मिळाल्याने ते पुढे जाऊ शकत नाहीत, हे पाहून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
या प्रकरणावर काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. पक्षाच्या प्रवक्त्यांनी प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप करताना म्हटले की, “राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर रोखण्यामागे मोदी सरकारचा राजकीय डाव आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला प्राधान्य देण्यासाठी इतरांच्या हालचाली अडवल्या जात आहेत. हे पूर्णतः लोकशाहीविरोधी आहे.”
काँग्रेसने या प्रकरणाची दखल घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. “निवडणुकीच्या प्रक्रियेत सर्व पक्षांना समान वागणूक मिळायला हवी, पण सध्या जे घडते आहे, ते लोकशाहीचे उल्लंघन आहे,” असे काँग्रेस नेत्यांनी ठणकावले आहे.
प्रशासनाकडून ही परवानगी तांत्रिक कारणांमुळे थांबवली गेल्याचा दावा केला जात आहे. मात्र, काँग्रेसने या स्पष्टीकरणाला फेटाळून लावत थेट प्रशासनाच्या निष्पक्षतेवरच सवाल उपस्थित केले आहेत.
राहुल गांधी झारखंडच्या प्रचार दौऱ्यावर असून रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सामाजिक न्यायाचे मुद्दे त्यांनी आपल्या भाषणांमधून मांडले आहेत.
VIDEO | Congress MP Rahul Gandhi’s helicopter is yet to take off from Jharkhand’s Godda as it awaits clearance from Air Traffic Control (ATC). pic.twitter.com/B8CTHoJ9Qs
— Press Trust of India (@PTI_News) November 15, 2024





