Rahul Gandhi : राहुल गांधींना पोलिसांनी उचलून गाडीत कोंबलं; प्रियंका गांधीही रस्त्यावर झोपल्या, काय घडलं दिल्लीत?
Rahul Gandhi : जंतर-मंतरकडे आंदोलनासाठी निघालेल्या इंडिया आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी रोखले. राहुल गांधींना ताब्यात घेतले, तर प्रियंका गांधींनी रस्त्यावर आंदोलन केले.

Rahul Gandhi : निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी जंतर-मंतरकडे निघालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांना बुधवारी पोलिसांनी रोखले. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राहुल गांधी यांना पोलिसांनी खांद्यावर उचलून गाडीत बसवले. यावेळी राहुल यांनी गाडीच्या दरवाजावर पाय अडवून विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना गाडीत बसवले.
दरम्यान, काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनाही पोलिसांनी रोखले. त्यांनी रस्त्यावर झोपून आंदोलन केले. पोलिसांनी आपल्याला धक्काबुक्की केली आणि शरीरावर ओरखडे पडल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ आघाडीचे खासदार जंतर-मंतरवर आंदोलनासाठी निघाले होते. त्यासाठी ते तीन बसमधून जात होते. मात्र, अशोक रोडवरील एका हॉटेलजवळ पोलिस आणि निमलष्करी दलाने बॅरिकेड लावून त्यांना अडवले.
विरोधी पक्षांचे खासदार निवडणूक आयोगाला भेटून ‘वोट चोरी’, एसआयआर आणि परिसीमनाच्या मुद्द्यावर चर्चा करू इच्छित होते. राहुल गांधी यांनी जवळपास ३०० खासदार निवडणूक आयुक्तांना भेटू इच्छित होते, मात्र त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही, असा आरोप केला.
यापूर्वी काँग्रेसकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी दुपारच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे खासदार सहभागी झाले. समाजवादी पक्षाचा प्रतिनिधी मात्र उपस्थित नव्हता.
यावर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी कार्यक्रमाचा निर्णय उशिरा झाल्याने काही पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होऊ शकले नसल्याचे स्पष्ट केले. खरगे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, कालही या नेत्यांनी दिल्लीत आंदोलन केले होते.





