Pune News | सात्यकी सावरकरांवर न्यायालयाचा अवमानाची कारवाई करण्याची राहुल गांधींची मागणी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात दावा दाखल करणाऱ्या सात्यकी सावरकर यांच्यावर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करावी, अशी पुरशीस राहुल गांधींच्या वकिलांनी मंगळवारी (दि.२९) विशेष न्यायालयाला दिली.सावरकरांविषयी अवमानकारक वक्तव्याचा उल्लेख असलेल्या राहुल गांधी यांच्या लंडनमधील भाषणाची सीडी व प्रमाणित शब्दांकन वारंवार मागणी करूनही तक्रारदारांनी बचाव पक्षाला दिलेले नाही.
ही कृती न्यायालयीन प्रक्रिया अडवणारी व स्पष्ट आदेशाचे उल्लंघन करणारी आहे.म्हणून, खटला सुरू होण्यापूर्वीच या दुर्दम्य व दुर्लक्ष करणाऱ्या वर्तनाची गंभीर दखल घेऊन न्यायालयीन अवमानाची कारवाई व्हावी, अशी मागणी राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी केली. या प्रकरणी आता १३ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या वकिलांच्या मागणीनुसार, सात्यकी सावरकर यांची आई हिमानी सावरकर यांच्या माहेरच्या गोडसे कुटुंबियांचा वंशवेल स्पष्टीकरणासह सात्यकी यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयात सादर केला.
या वंशवेलाचा संबंधित खटल्याशी काहीही संबंध नसून, राहुल गांधी यांच्याकडून नथुराम गोडसेंच्या नावाचा विनाकारण उल्लेख करून खटला लांबविण्याचा व दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे न्यायालयाने राहुल गांधी यांना अनावश्यक अर्ज दाखल न करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी अॅड. संग्राम कोल्हटकर यांनी केली.





