Kiren Rijiju : राहुल गांधींची PM मोदींवर टीका, भाजप आक्रमक; किरेन रिजिजू यांनी विचारले चार बोचरे सवाल
Kiren Rijiju : १९६२ मध्ये चीनने त्यांच्या गावावर कब्जा केला होता, असा उल्लेख करत त्या पराभवाबद्दल काँग्रेस पक्ष माफी मागणार का, असा पहिला सवाल त्यांनी उपस्थित केला.

Kiren Rijiju : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘तडजोड केलेले पंतप्रधान’ अशी खोचक टीका केल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपचे संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी थेट चार सवाल केले आहेत.
१९६२ मधील चीनसोबतच्या युद्धातील पराभव, भारताची आर्थिक स्थिती आणि देशाच्या प्रतिमेवरून त्यांनी काँग्रेसला जाब विचारला आहे. किरेन रिजिजू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत काँग्रेसला चार प्रश्नांची उत्तरे देण्याचं आव्हान दिलं. (Kiren Rijiju)
१९६२ मध्ये चीनने त्यांच्या गावावर कब्जा केला होता, असा उल्लेख करत त्या पराभवाबद्दल काँग्रेस पक्ष माफी मागणार का, असा पहिला सवाल त्यांनी उपस्थित केला. दुसऱ्या प्रश्नात काँग्रेसच्या सत्ताकाळात भारत गरीब देश का राहिला, असा सवाल त्यांनी केला. तर भारताला ‘गारुड्यांचा देश’ असं का संबोधलं गेलं आणि भारतीय अर्थव्यवस्थेला ‘हिंदू विकास दर’ असं नाव देऊन तिचा अपमान का करण्यात आला, असे आणखी दोन प्रश्न रिजिजू यांनी विचारले आहेत. (Kiren Rijiju)
Congress must answer 4 questions:
1. My village was occupied by China in 1962. Will Congress apologize for 1962 humiliation?
2. Congress kept India a poor nation. Why?
3. Why was India called land of snake charmers?
4. Why was India’s economy insulted as Hindu rate of growth? https://t.co/ojrdYYDFLA— Kiren Rijiju (@KirenRijiju) November 20, 2026
यामुळे आता किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींना विचारलेल्या चार प्रश्नांना काय उत्तर देणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते? (Kiren Rijiju)
दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी चीनमध्ये झालेल्या एशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन (APEC) शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. या परिषदेदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय बैठकीचा फोटो शेअर करत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
‘काँग्रेस सत्तेत असती, तर भारताचे पंतप्रधानही या टेबलावर बसले असते. तडजोड करणारे पंतप्रधान या टेबलावर कधीच बसू शकत नाहीत,’ असं राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्यांच्या याच विधानावरून किरेन रिजिजू यांनी काँग्रेसला चार प्रश्न विचारले आहेत.





