Rahul Gandhi : “सोमनाथ सुर्यवंशीला मारहाण…”; राहुल गांधी परभणीत दाखल

Rahul Gandhi – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज (सोमवारी) परभणीच्या दौऱ्यावर आहेत. याप्रसंगी त्यांनी पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुण कार्यकर्त्याच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर घडलेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता.
या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दोनदिवसांपूर्वी (शनिवारी) परभणीत जाऊन सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली. आता राहुल गांधी सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेण्यासाठी परभणी भागात दाखल झाले आहेत.
दरम्यान, यावेळी परभणीत पोहचताच राहुल गांधी यांनी सर्वात आधी शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. यावेळी सोमनाथच्या आईने टाहो फोडत माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी राहुल गांधी यांच्याकडे केली.
राहुल गांधी हे 2.30 वाजेच्या सुमारास परभणी शहरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, प्रज्ञा सातव, संजय जाधव, नितीन राऊत, अमित देशमुख आदींचे उपस्थिती होती. दरम्यान, यावेळी सोमनाथ सुर्यवंशीला मारहान झाली असल्याचं देखील राहुल गांधी यांनी म्हंटलं.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या झाली आहे. या घटनेला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. सोमनाथ सुर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे. पोलिसांनी सोमनाथ सुर्यवंशीला मारहाण करून त्याची हत्या केली आहे, असा खळबळजनक आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यामुळे आता राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राहुल गांधी म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी हा दलित होता म्हणून त्याच्यावर अन्याय करण्यात आला. त्याला मारहाण करण्यात आली आहे. दलित आहे म्हणून सोमनाथ सुर्यवंशीची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनीच त्याला मारलं आहे. या घटनेला आरएसएसची विचारधारा जबाबदार आहे. या ठिकाणी कोणतेही राजकारण होत नाही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत खोटं बोलले आहेत, असं देखील राहुल गांधींनी यावेळी सांगितलं आहे.





