हंगामी प्रशिक्षक होण्याची द्रविडला विनंती

मुंबई – भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकदामीचा संचालक राहुल द्रविडला हंगामी प्रशिक्षक होण्याची विनंती बीसीसीआयने केल्याचे समोर आले आहे. पूर्णवेळ प्रशिक्षकपद स्वीकारण्यास त्याने नकार दिल्यानंतरही बीसीसीआयकडून त्याची मनधरणी सुरु आहे. त्याचबरोबर द्रविड आपल्या नकारावर ठाम राहिला तर येत्या काळात या पदासाठी लवकरच अर्ज मागवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर न्यूझीलंडचा संघ भारतात येत आहे. या मालिकेसाठी तरी द्रविडने हंगामी प्रशिक्षकपद स्वीकारावे यासाठी ही विनंती करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह अन्य सहाय्यक प्रशिक्षक टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर आपले पद सोडणार आहेत. त्यामुळेच द्रविडवर संघाची जबाबदारी सोपवण्यासाठी बीसीसीआयने त्याला विनंती करण्याचा निर्णय घेतला आहे.
जागतिक क्रिकेटमधील अनेक माजी क्रिकेटपटूंनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले असले तरीही सध्या बीसीसीआय भारतीय व्यक्तीलाच प्रशिक्षक बनवण्याच्या तयारीत आहे. द्रविडनेच पूर्णवेळ प्रशिक्षक व्हावे अशी बीसीसीआयची इच्छा होती. मात्र, हा प्रस्ताव द्रविडने नाकारला आहे.
भारतीय संघाचा पूर्णवेळ प्रशिक्षक झाल्यावर सातत्याने मोठे दौरे तसेच त्यासाठी प्रचंड प्रवासही करावा लगेल त्यामुळे सध्यातरी या पदावर काम करण्याची माझी तयारी नसल्याचे द्रविडने बीसीसीआयला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.
योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी अर्ज मागवावे लागणार असून त्यानंतर त्यांचे सादरीकरण तसेच त्यांच्या मुलाखती ही सर्व प्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र, त्यासाठी वेळ खूपच कमी असल्याने सध्या न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात होत असलेल्या मालिकेसाठी तरी द्रविडलाच हंगामी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याकडे बीसीसीआयचा कल आहे.





