हरियाणाच्या गृहमंत्र्यांचे वक्तव्य
चंडीगढ : बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे हरियाणाचे गृहमंत्री आणि भाजपचे नेते अनिल विज यांनी आता राहुल आणि प्रियांका गांधी या कॉंग्रेस नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. राहुल आणि प्रियांका हे जिवंत पेट्रोल बॉम्ब आहेत. जनतेने त्यांच्यापासून सावध रहावे, असे विज यांनी म्हटले आहे.
नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधातील निदर्शनांवेळी उत्तरप्रदेशात अलिकडेच हिंसाचार झाला. त्यात मृत्युमुखी पडलेल्या निदर्शकांच्या कुटूंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल आणि प्रियांका मंगळवारी निघाले. मात्र, त्यांना मेरठ पोलिसांनी रोखले.
त्या घटनेचा संदर्भ देऊन विज यांनी एक ट्विट केले. राहुल आणि प्रियांका जिथे जातात; तिथे आग लावतात. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते, असे विज यांनी म्हटले.
वाद उफाळण्याची कुठलीही तमा न बाळगत विज आक्रमकपणे भूमिका मांडत असतात. प्रामुख्याने कॉंग्रेस आणि त्या पक्षाच्या नेत्यांवर टीका करताना ते वादंग निर्माण होण्याच्या शक्यतेची चिंता करताना दिसत नाहीत.