पुणे जिल्हा | राहू बेट तापाने फणफणला

राहू, (वार्ताहर)- दौंड तालुक्यातील राहू बेट परिसर हा सध्या साथीच्या आजाराने बेजार झाला आहे. नदीला दोन वेळा येऊन गेलेला पूर, सतत पडणारा पाऊस आदी कारणामुळे साथीचे आजार डोके वर काढताना दिसत आहेत. बेट परिसराला मुळा-मुठा व भीमा नद्यांचा पूर्ण वेढा आहे.
गेल्या महिन्याभरापासून होत असलेला पाऊस व नदीला आलेले दोन वेळा महापूर यामुळे बेटातील गावांचे आरोग्य बिघडले आहे. त्यावर कोणतीही ग्रामपंचायत उपाययोजना करताना दिसून येत नाही.
नागरिकाच्या खिशाला तसेच आरोग्याला देखील झळ पोहोचत आहे. बेट परिसरात साधारणपणे प्रत्येक गावात जलजीवन योजना राबविलेली आहे. परंतु अजूनही नागरिकांना बंद नळातून पाणी पुरवठा होताना दिसून येत नाही.
पाण्यापासून होणाऱ्या आजारात वाढ होताना दिसून येत आहे. त्वरित उपाययोजना होणे गरजेचे आहे. धुरळणी, फवारणी अशा उपाययोजना ग्रामपंचायतीने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.पाण्याचे डबके, बंद पडलेल्या जुन्या पाण्याच्या टाक्या, ओला कचरा आदी लक्ष देऊन त्या नष्ट करणे गरजेचे आहे.
सध्या सर्दी, खोकला, ताप याची मोठ्या प्रमाणात साथ चालू आहे. नागरिकांनी काही पथ्य पाळणे गरजेचे आहे. यामध्ये भरपूर पाणी पिणे, पाणी उकळून पिणे, मांसाहार टाळणे, बाहेरचे पदार्थ न खाणे यासारख्या गोष्टी पाळल्यास त्रास कमी होईल. – डॉ. किरण थोरात, संचालक सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ,राहू.
डेंग्यूच्या रुग्णांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. ताप, थकवा, तीव्र डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, त्वचेवर पुरळ उठणे आदी लक्षणे आढळल्यास ताबडतोब उपचार करणे गरजेचे आहे. – डॉ. दयानंद जाधव, चैतन्य हॉस्पिटल. राहू.
आमच्याकडून सर्व्हे चालू असून डेंग्यूचे प्रमाण कमी आहे. परंतु गावागावात जाऊन सर्व्हे केला जात आहे. लक्षणे दिसल्यास ताबडतोब पीएचसीमार्फत दखल घेतली जात आहे.
संभावित गावात आमची टीम जात असून उपाययोजना केल्या जात आहेत. डेंग्यू बरोबरच इतर सर्दी, खोकल्याचे रुग्ण देखील आहेत. नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन लक्षणे दिसल्यास ताबडतोब आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. – डॉ. पूजा चिंचोलीकर कोकरे, पीएच. सी. राहू
ग्रामपंचायतीची जवाबदारी मोठी
सर्व विषयामध्ये ग्रामपंचायतीने जवाबदारी घेऊन फवारणी, धुरळणी करणे गरजेचे आहे. ओला कचरा, सुका कचरा नियोजन करणे गरजेचे आहे.
गावात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचू न देणे इत्यादी उपाययोजना कराव्या लागणार आहे. ही साथ रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.





