Rahimatpur : रहिमतपूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! शिवसेनेचे वासुदेव माने आता सुनील माने यांच्यासोबत

प्रभात वृत्तसेवा
रहिमतपूर – रहिमतपूर नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज वाटपावरून महायुतीमध्ये चांगलेच बिनसले असून माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांनी आपला सवतासुबा कायम ठेवत राष्ट्रवादी अजित दादा गटाचे सुनील माने यांच्याबरोबर युती केली आहे. या नाट्यमय घडामोडीमुळे भाजपमधील नाराजी नाट्य अजून समोर येत आहे.
रहिमतपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सुनील माने यांच्या विरोधात सौ. चित्रलेखा माने कदम, नीलेश माने व वासुदेव माने यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत नगरपालिकेसाठी दंड थोपटले होते . परंतु, महायुतीतच जागा वाटपाचा तिढा शेवटपर्यंत सुटला नाही. यामुळे वासुदेव माने यांनी महायुतीची साथ सोडत सुनील माने यांच्याबरोबर युती केली असून राष्ट्रवादीचे घड्याळ व शिवसेनेचे धनुष्यबाण रहिमतपूरच्या निवडणुकीत एकत्रित लढणार असल्याचे चित्र समोर येत आहे.
आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी रहिमतपूर नगरपालिकेत अनेक नाट्यमय घडामोडी घडत असून भाजपमधील नाराजी नाट्य अजून समोर येत आहे. नगराध्यक्षपदासाठी सुद्धा सुनील माने यांच्या पत्नी सौ. नंदिनी माने व नीलेश माने यांच्या पत्नी सौ. वैशाली माने यांचे अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून सौ. चित्रलेखा माने कदम नाराज असल्याची चर्चा रहिमतपूर पंचक्रोशीत सुरू आहे.





