Raghav Chadha : आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरून हटवल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या घडामोडीनंतर चढ्ढा भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असा दावा आतिशी यांनी केला आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी भाजपवर गंभीर आरोप करत हा दावा मांडला. आतिशी म्हणाल्या की, “भाजपची एक ठरलेली पद्धत आहे. ते आधी विरोधी पक्षातील नेत्यांना घाबरवतात, नंतर धमकावतात आणि शेवटी आमिष दाखवतात. अनेक नेते या दबावाला बळी पडून भाजपमध्ये गेले आहेत. आता राघव देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.” त्यांनी पुढे आरोप केला की, देशात लोकशाही धोक्यात आहे आणि निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार होत आहेत. “दिल्लीत मतदारांची नावे कमी करण्यात आली, बोगस मतदान झाले. आता पश्चिम बंगालमध्येही असेच प्रकार होत आहेत,” असेही त्या म्हणाल्या. आतिशी यांनी चढ्ढा यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी पक्षाची भूमिका उचलली नाही, सभात्याग करण्यास नकार दिला, तसेच निवडणूक आयुक्तांविरोधातील प्रस्तावावर सही केली नाही, असे आरोप त्यांनी केले. या सर्व घडामोडींमुळे राघव चढ्ढा यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले असून, येत्या काळात ते कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.