Bacchu Kadu : मोठी बातमी..! बच्चू कडूंना अटक होणार? ‘या’ भाजप आमदाराच्या भावाला संपवण्याचा रचला कट?
Bacchu Kadu : प्रहार नेते बच्चू कडू यांच्यावर चांदूर बाजार पोलीस ठाण्यात हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Bacchu Kadu : जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली असून प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अपघाताचा बनाव रचत भाजप आमदाराच्या भावाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप त्यांच्या विरोधात करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रवीण तायडे यांच्या तक्रारीवरून अमरावती ग्रामीण पोलिसांनी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बच्चू कडू यांच्यासह गोलू माहुरे आणि आणखी एका व्यक्तीवर हत्येच्या प्रयत्नाचा गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत भाऊ अभिजित तायडे यांना रस्ते अपघाताचा बनाव करून ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता. या प्रकरणात पेन ड्राइव्हसह काही पुरावे सादर करण्यात आल्याची माहिती आहे. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
अभिजित तायडे यांनी आपल्या तक्रारीत बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी शुभम उर्फ गोलू माहुरे यांनी मिळून हा कट आखल्याचा दावा केला आहे. घातपात घडवून अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न होता, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणानंतर चांदूर बाजारसह संपूर्ण अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून राज्याच्या राजकारणातही या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.






