मुंबई – कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करीत दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करण्यात आले. असे असले तरी राज्यातील अनेक ठिकाणी लसीकरणांच्या मुद्यावरून नागरिकांचा राडा दिसून येत आहे.
राज्यात अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यामुळे वारंवार करोना लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागत आहे. मुंबई, ठाणे, वसई विरारसह अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद आहेत. यामुळे लस घेण्याच्या प्रतिक्षेत असलेले नागरिक हैराण झाले आहेत.
तर दुसरीकडे तिसरी लाट रोखण्यासाठी जास्त प्रमाणावर लसीकरण गरज असल्यामुळे सध्या लसीकरण केंद्रावरचं नागरिक तुफान गर्दी असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र लस तुटवड्यामुळे अनेक केंद्रावर नागरिकांकडून लस घेण्यासाठी हाणामारी केली जात आहे.
असेच काहीसे मीरा रोड येथील लसीकरण केंद्रावर झाले आहे. मीरा रोड परिसरात लसीकरणासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. कोरोना लसीसाठी नागरिकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली.
मिळलेल्या माहितीनुसार नागरिकांनी लस घेण्यासाठी रात्रभर रांगेत उभं राहिल्यानंतरही त्यांच्या पदरी निराशा आली आहे. रात्री ऑफलाइन लसीकरणाचा बोर्ड लावून सकाळी ऑनलाइन नोंदणी केलेल्या लोकांनाच लस दिल्याचा विचित्र प्रकार मीरा रोड येथील एका लसीकरण केंद्रात घडला आहे त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये लसीकरणावरून चांगला राडा होता दिसून आला. यामुळे रात्रभर रांगेत उभं राहूनही लस न मिळाल्यानं नागरिकांनी लसीकरण केंद्रावरच गोंधळ घातला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.