मंचर : मंचर नगराध्यक्षपद आणि नगरसेवक पदासाठी चढाओढ सुरू, पण नागरी सुविधांवर मौन असल्याचे चित्र दिसत आहे. मंचर नगरपंचायतीची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून, इच्छुक उमेदवार आणि नेते मंडळींनी निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी कंबर कसली आहे. मात्र, या राजकीय उत्साहात नागरिकांच्या मूलभूत सुविधा मात्र दुर्लक्षित राहिल्या आहेत. तब्बल चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पुन्हा एकदा नागरिकांना लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी मिळत आहे. नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी अनेक दिग्गज, नवीन चेहरे आणि कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ सुरू असून राजकीय समीकरणांनाही वेग आला आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतेचा अभाव, पार्किंगची समस्या आणि सार्वजनिक सोयीसुविधांचा अभाव या प्रश्नांवर कोणतीही ठोस भूमिका घेताना उमेदवार दिसत नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनांचा पाऊस पडत असला तरी नागरिकांना प्रत्यक्ष कामांची अपेक्षा आहे. या निवडणुकीत मतदार विकास, स्वच्छता आणि नागरी सुविधा यांना प्राधान्य देणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा देतील, अशी चर्चा शहरात रंगू लागली असून नागरिक आता जागरूक मतदार म्हणून पुढे येत आहेत.