Pune District : भटक्या आणि पाळीव श्वानांचे ‘रेबीज लसीकरण’
Pune District : या मोहिमेअंतर्गत परिसरातील सर्व भटक्या आणि पाळीव श्वानांना विनामूल्य लस टोचली जात आहे.

चिंबळी : खेड तालुक्यातील कुरुळी आणि चिंबळी परिसरात कुत्र्यांची वाढती संख्या व रेबीज रोगाचा वाढता धोका लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासन आणि पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने ‘विशेष रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम’ हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत परिसरातील सर्व भटक्या आणि पाळीव श्वानांना विनामूल्य लस टोचली जात आहे.
मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षित श्वान पकडणारे कर्मचारी व स्वयंसेवकांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. हे पथक गावनिहाय वस्त्यांमध्ये व चौकांमध्ये जाऊन आधुनिक साधनांच्या साहाय्याने श्वानांना सुरक्षितपणे पकडून लसीकरण करत आहे. तसेच, लस दिलेल्या श्वानांची ओळख पटावी म्हणून त्यांच्यावर विशिष्ट रंगाचा तात्पुरता मार्क (खून) केला जात आहे.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
“रेबीज हा प्राणघातक आजार असून, वेळेत लसीकरण करणे हाच त्यावर एकमेव प्रभावी उपाय आहे,” असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. परिसरातील सर्व पाळीव श्वानमालकांनी आपल्या प्राण्यांचे लसीकरण करून घ्यावे, तसेच भटक्या श्वानांची माहिती तत्काळ पथकाला द्यावी, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे श्वानचाव्याच्या घटनांना आणि रेबीजच्या धोक्याला आळा बसेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.





