Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; वृद्धाचा मृत्यू तर १५ जण जखमी
Dog Attack: चिंचोली फाटा परिसरात भीतीचे वातावरण

राहुरी : राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत नागरिकांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात साहेबराव राघुजी वाघमारे वय ७० यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, आणखी १५ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, साहेबराव वाघमारे हे त्यांच्या घरासमोरील दुकानाजवळ झोपलेले असताना पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्याचवेळी कुत्र्याने परिसरातील इतर नागरिकांनाही चावा घेतल्याने एकूण १५ जण जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच जीवनदायी ॲम्ब्युलन्सचे निखिल भोसले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी साहेबराव वाघमारे यांना राहुरी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या सर्वांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच चिंचोली गावचे सरपंच सुरेश उर्फ बंटी लाटे, स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय विभागाचे पथक तसेच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह पोलीस प्रशासनाने धाव घेतली.
या घटनेमुळे चिंचोली फाटा परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा:





