विश्वविजेत्या डी गुकेशला आर प्रज्ञानंदने दिला पराभवाचा धक्का, टाटा स्टील मास्टर्स 2025 विजेतेपदावर कोरले नाव

TATA Steel Chess Masters: नेदरलँडच्या विझ्क आन जी येथे पार पडलेल्या टाटा स्टील मास्टर्स 2025 या बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदावर ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने नाव कोरले आहे. आर प्रज्ञानंदने विश्वविजेता डी गुकेशचा पराभव करत ही स्पर्धा जिंकली.
प्रज्ञानंदने टायब्रेकमध्ये डी गुकेशचा 2-1 असा पराभव करत इतिहास रचला आहे. जवळपास 19 वर्षानंतर भारतीय बुद्धिबळपटूने टाटा स्टील मास्टर्स जिंकण्याची कामगिरी केली आहे. याआधी 2006 मध्ये विश्वनाथ आनंद यांनी ही स्पर्धा जिंकली होती.
14 खेळाडूंच्या राउंड-रॉबिन इव्हेंटमध्ये 2 भारतीय बुद्धिबळपटू 13 क्लासिकल राउंडच्या शेवटी बरोबरीत होते. प्रज्ञानंद आणि गुकेश या दोघांनाही शेवटच्या क्लासिकल गेममध्ये पराभवाचा सामना करावा लागला. गुकेशचा 31 चालींमध्ये ग्रँडमास्टर अर्जुन एरिगासीकडून, तर प्रज्ञानंदला मॅरोथॉन मॅचमध्ये ग्रँडमास्टर विंसेंट कीमरकडून पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर दोघांचेही गुण 8.5 होते.
🚨 BREAKING: Praggnanandhaa R wins the 2025 Tata Steel Masters! 🏆♟️
A stunning performance in Wijk aan Zee crowns him champion! 🎉🔥
Congratulations, Pragg!! pic.twitter.com/Xt2Lnw6doq
— Tata Steel Chess Tournament (@tatasteelchess) February 2, 2025
गुकेशने पहिल्या ब्लिट्ज टायब्रेकमध्ये विजय मिळवला होता. मात्र, प्रज्ञानंदने मागून येत दोन्ही ब्लिट्ज गेम जिंकण्याची कामगिरी केली व गुकेशला हरवत पहिल्यांदाच या स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले.
दोन राउंडच्या टाय-ब्रेकनंतर गुकेश आणि प्रज्ञानंदचे पॉइंट्स समान होते. सामन्याच्या शेवटच्या 10 सेकंदांपर्यंत दोघेही समान पातळीवर होते. मात्र, गुकेशच्या एका चुकीमुळे प्रज्ञानंदला फायदा मिळाला व त्याने विजेतेपदाला गवसणी घातली.
गुकेशला सलग दुसऱ्यावर्षी या स्पर्धेच्या टायब्रेकरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्यावर्षी चीनच्या वेई यीकडून पराभव पत्करावा लागला होता. जागतिक विजेता झाल्यानंतर डी गुकेशचा पहिल्यांदा स्पर्धेत पराभव झाला आहे.





