कुराण जाळणाऱ्या मोमिकाची स्वीडनमध्ये गोळ्या घालून हत्या

स्टॉकहोम – स्वीडनमध्ये कुराणाचा अवमान करणाऱ्या सलवान मोमिका याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सलवान हा इस्लामचा टीकाकार होता. गेल्या वर्षी ईदच्या निमित्ताने स्वीडनची राजधानी स्टॉकहोममधील सर्वात मोठ्या मशिदीसमोर त्याने मुस्लिम पवित्र धार्मिक ग्रंथ कुराणाचा अवमान केल्यामुळे तो चर्चेत आला होता.
मोमिकाचा कुराणाचा अवमान करतानाचा चिथावणीखोर व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक मुस्लिम देशांमध्ये संतापाची लाट उसळली होती आणि अनेक ठिकाणी दंगली आणि अशांतता निर्माण झाली.
इराकी ख्रिश्चन सलवान मोमिका हा वांशिक द्वेष भडकवल्याबद्दल दोषी आहे की नाही यावर स्टॉकहोम न्यायालय गुरुवारी निर्णय देणार होते. प्रतिवादीचा मृत्यू झाल्याचे सांगत न्यायालयाने निकाल पुढे ढकलला.
मोमिकाने स्वतःला इराकमधील ख्रिश्चन मिलिशियाचा प्रमुख म्हणून सादर केले होते. त्यांची संघटना इमाम अली ब्रिगेड्स अंतर्गत येते. ही संघटना २०१४ मध्ये स्थापन झाली आणि तिच्यावर युद्ध गुन्ह्यांचा आरोप आहे. २०१७ मध्ये इराकी शहर मोसुलच्या बाहेरील भागात सलवान मोमिका याने स्वतःचा सशस्त्र गटही स्थापन केला.





