Quinton de Kock Century : वानखेडेवर डिकॉकची त्सुनामी! ५ वर्षांनंतर मुंबईच्या संघात परतताच ठोकलं तुफानी शतक
Quinton de Kock Century : या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने क्विंटन डिकॉकच्या शतकी खेळीच्या जोरावर १९५ धावांचा डोंगर उभारला आहे.

Quinton de Kock Century MI vs PBKS : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी रात्री क्विंटन डिकॉक नावाचे वादळ धडकले. तब्बल ५ वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या (MI) निळ्या जर्सीत मैदानात उतरलेल्या डिकॉकने पंजाब किंग्सच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत डिकॉकने सलामीला येत एका धडाकेबाज शतकी खेळीसह अनेक विक्रमांना गवसणी घातली.
पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, पण क्विंटन डिकॉकने त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. दुखापतीमुळे रोहित शर्मा या सामन्यात खेळू शकला नाही, त्यामुळे सलामीची जबाबदारी डिकॉकवर होती. सुरुवातीला दोन गडी स्वस्तात बाद झाले असतानाही डिकॉकने डगमगून न जाता आक्रमक पवित्रा घेतला. त्याने अवघ्या ५३ चेंडूंत ७ चौकार आणि ७ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने आपले आयपीएलमधील तिसरे शतक पूर्ण केले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट १९० पेक्षा जास्त होता.
Quin𝗧𝗢𝗡 de Kock! 🤩
Back in the team and he smashes his 3️⃣rd #TATAIPL HUNDRED 💯🔥
Updates ▶️ https://t.co/Fn2dxJ4zYR#KhelBindaas | #MIvPBKS | @mipaltan pic.twitter.com/stcEEhdSfQ
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2026
तीन वेगवेगळ्या संघांसाठी शतक ठोकणारा तिसरा खेळाडू –
क्विंटन डिकॉकने या शतकासह आयपीएलमध्ये एक दुर्मिळ विक्रम प्रस्थापित केला आहे. तीन वेगवेगळ्या संघांसाठी (दिल्ली डेअरडेविल्स- २०१६, लखनऊ सुपर जायंट्स- २०२२ आणि आता मुंबई इंडियन्स- २०२६) शतक झळकावणारा तो आयपीएल इतिहासातील तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी केवळ केएल राहुल आणि संजू सॅमसन यांनीच अशी कामगिरी केली होती. विशेष म्हणजे, या तिन्ही खेळाडूंनी प्रत्येकी एक शतक दिल्लीच्या संघाकडून खेळताना झळकावले आहे.
टी-२० क्रिकेटमधील ९ व्या शतकाची नोंद –
पंजाब किंग्सविरुद्ध शतक ठोकणारा डिकॉक हा मुंबई इंडियन्सचा दुसराच फलंदाज ठरला आहे. २०१४ मध्ये लेंडल सिमन्सने अशी कामगिरी केली होती. या खेळीसह डिकॉकने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्यांच्या यादीत सातवे स्थान पटकावले आहे. ख्रिस गेल (२२), बाबर आझम (११) आणि विराट कोहली (९) यांसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत आता डिकॉकचे नावही कोरले गेले आहे. डिकॉकच्या या ‘विराट’ खेळीमुळे मुंबईने पंजाबसमोर धावांचा डोंगर उभा केला आहे.





