अजिंठा लेणी पाहण्यासाठी रोज दीड तास रांगा; चार हजार पर्यटकांसाठी फक्त २ बसेस

छत्रपती संभाजीनगर – अजिंठा लेणीला भेट देण्यासाठी देश-विदेशातून रोज सुमारे ४ हजार पर्यटक येतात. परंतु, शॅापिंग प्लाझा ते फूट हिल्स या ४ किलोमीटर दरम्यानचा प्रवास करण्यासाठी पर्यटकांना एसटी महामंडळाच्या दोनच बस आहेत.
त्यामुळे पर्यटकांचे हाल होत आहेत. शुक्रवारी लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या दीड तास रांगा लागल्या होत्या. त्यामुळे त्यांना बस स्टॉपवर ताटकळत उभे राहावे लागले. परिणामी एका बसमध्ये ७० ते ८० प्रवाशांना प्रवास करावा लागला.
अजिंठा लेणीला भेट देण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना शॅापिंग प्लाझा ते फूट हिल्स हा चार किमीचा प्रवास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बसने करावा लागतो. अशा प्रकारच्या बस दोनच आहेत.
शाळेतील सहली आणि ख्रिसमसच्या सुट्यांमुळे विदेशी पर्यटकांची संख्या बसच्या तुलनेत वाढली आहे. त्यामुळे बस अपुऱ्या पडत आहेत. गुरुवारी बस उपलब्ध नसल्याने दोन ते अडीच तास पर्यटकांना बसची वाट पाहत उभे राहावे लागले. त्यामुळे विदेशी पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.
केंद्रीय पर्यटन विभागाच्या विभागीय संचालकांकडे आम्ही ही माहिती पोहोचवली आहे. राज्य परिवहन मंडळासोबतही चर्चा केली असून सुट्यांत जास्तीच्या बसेस सोडण्याचे मान्य केले आहे.
– सुनीत कोठारी, टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन
शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहली सुरू झाल्या आहेत. तसेच ख्रिसमसच्या सुट्यांमुळे विदेशी पर्यटकांची संख्या वाढली आहे. या सुट्यांमध्ये अजिंठा लेणी पाहण्यासाठी गर्दी वाढली आहे. २ बस अपुऱ्या पडत असून ८ बस सुरू करा.
– आमोद बसोले, गाईड, अजिंठा लेणी.





