Vivekanand Patil : सरकारला सवाल, व्यवस्थेवर प्रहार! आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोण?
Vivekanand Patil : अवघ्या २४ वर्षांच्या विवेकानंद पाटील याच्या भाषणातील खास शैली आणि सरकारला थेट सवाल करण्याची पद्धत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Who is Vivekanand Patil? : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची राज्यभरात चर्चा आहे. या आंदोलनाच्या व्यासपीठावरून आपल्या खास कोल्हापुरी शैलीतील आक्रमक भाषणाने एका तरुणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा तरुण म्हणजे विवेकानंद मारुती पाटील.
अवघ्या २४ वर्षांच्या विवेकानंद पाटील याच्या भाषणातील खास शैली आणि सरकारला थेट सवाल करण्याची पद्धत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच्या भाषणातील अनेक वक्तव्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांकडून त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले जात आहे.
कोण आहेत विवेकानंद पाटील?
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील माजगाव हे विवेकानंद पाटील याचे मूळ गाव आहे. सध्या त्याच्या नावाची मोठी चर्चा होत असली, तरी आंदोलनात सहभागी होण्यापूर्वीपासूनच त्यांनी विविध सामाजिक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घेत आवाज उठवला आहे.
विवेकानंद याने कुरुकली येथील भोगावती महाविद्यालयातून दोन वर्षांपूर्वी राज्यशास्त्र विषयातून पदवी घेतली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्याने एमपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. आतापर्यंत त्याने एमपीएससीच्या दोन परीक्षा दिल्या आहेत. सध्या तो मराठी माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा देण्याची तयारी करत आहेत.
शेतकरी कुटुंबातून आलेला तरुण
विवेकानंद पाटील याची कौटुंबिक पार्श्वभूमीही संघर्षाची आहे. त्याचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून आई गृहिणी आहे. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. विशेष म्हणजे त्याच्या पावलावर पाऊल ठेवत त्याची लहान बहीणही सध्या एमपीएससी परीक्षेची तयारी करत आहे.
बालपणापासूनच वक्तृत्वाची आवड असलेल्या विवेकानंद याने पुण्यातील आंदोलनाच्या व्यासपीठावरून शेतकरी, कष्टकरी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. पेपरफुटी आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होणाऱ्या परिणामांवर त्याने आपल्या खास कोल्हापुरी शैलीतून सरकारला जाब विचारला.
त्याच्या आक्रमक मांडणीमुळे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठावरून आवाज दिल्यामुळे विवेकानंद पाटील सध्या एमपीएससी आंदोलनातील चर्चेतील चेहरा ठरत आहेत. आगामी काळात त्याच्या भूमिकेकडे राज्यातील स्पर्धा परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.






