राज्यपालांच्या निमंत्रणावरूनच आलोय, मला का आडवता?

सुरक्षा अधिकाऱ्यांना श्रीनगरात राहुल गांधींचा सवाल

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते व अन्य विरोधी पक्ष नेते काल श्रीनगरची पहाणी करण्यासाठी गेले होते. पण त्यांना श्रीनगर विमानतळावरच अडवून ठेवण्यात आले. त्यांना बाहेर जाऊ देण्यात आले नव्हते. त्यावेळी तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांशी राहुल गांधी यांनी जी कैफियत मांडली त्याचा व्हिडीओ आज कॉंग्रेसच्या वर्तुळातूनच व्हायरल करण्यात आला आहे. आपल्याला काश्‍मीरात येण्याचे निमंत्रण राज्यपालांनीच दिले होते त्यांच्याच निमंत्रणावरून आपण येथे आलो आहोत त्यामुळे तुम्ही मला अडवू शकत नाही असे राहुल गांधी तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांना ऐकवत असल्याचे दिसून आले आहे.

श्रीनगरात परिस्थिती सुरळीत झाली आहे असा येथील प्रशासनाचा दावा असेल तर आम्हाला तेथे जायला काय प्रॉब्लेम आहे अशीही विचारणा राहुल गांधी यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना केली होती. पण सुरक्षा अधिकारी त्यांना प्रतिउत्तर न देता तेथेच थांबून होते. त्यांच्यापुढे राहुल गांधी यांच्या या प्रतिपादनाचा काही उपायोग झाला नाही. शेवटी या नेत्यांना श्रीनगर विमानतळावरूनच दिल्लीला परत जावे लागले. दिल्लीतही त्यांना घेऊन येणाऱ्या विमानाला उतरण्यास त्वरीत परवानगी मिळाली नाही त्यामुळे या विमानाला तेथेच घिरट्या घालत फिरावे लागले असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

दरम्यान कॉंग्रेस पक्षानेही राज्यपाल मलिक यांना टोमणे मारणारा संदेश प्रसारीत केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की राज्यपाल मलिक यांनीच मोठ्या तोंडाने राहुल गांधी यांनी काश्‍मीरात येऊन परिस्थितीची पहाणी करावी आणि मग बोलावे असे म्हटले होते. काश्‍मीरातील स्थिती सुरळीत झाली आहे असा दावा सरकार रोज करीत आहे मग या नेत्यांना तेथे प्रवेश बंदी का करण्यात आली असा सवाल कॉंग्रेसने आपल्या ट्विटरवर विचारला आहे. राहुूल गांधी यांच्या समवेत अन्य विरोधी पक्षांचे अकरा नेते यावेळी श्रीनगरला गेले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.