तणमोराच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह

– गायत्री वाजपेयी
पुणे – माळढोक प्रजातीतील पक्ष्यांच्या अस्तित्वाबद्दल सातत्याने चिंता व्यक्त केली जात असताना, याच प्रकारातील तणमोराच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. वन विभागातर्फे गेल्या दोन वर्षांपासून तणमोरांच्या नोंदीबाबत सर्वेक्षण होत आहे. मात्र, अद्यापपर्यंत एकदाही तो दिसला नसल्याने, त्यांच्या अस्तित्वाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
तणमोर म्हणजेच लेसर फ्लोरिकन हा गवताळ प्रदेशात राहणारा पक्षी आहे. गवतासारखा करडा रंग आणि वैशिष्ट्यपूर्ण शरीररचनेमुळे आकर्षक दिसणारा माळढोक प्रजातील हा पक्षी लक्ष वेधून घेतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तणमोरांची संख्या लक्षणीयरित्या खालावत आहे. दोन वर्षांपूर्वी वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केलेल्या सर्वेक्षणात या पक्ष्याची संख्या 80 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले होते; तर नुकत्याच प्रकाशित झालेल्या “स्टेट ऑफ बर्डस’ या अहवालात तणमोरासहित माळढोक प्रजातीतील माळढोक (ग्रेट इंडियन बस्टर्ड), मॅक्वीनस बस्टर्ड आणि बेंगाल फ्लोइरिकन अशा माळढोकच्या चारही प्रजातीतील पक्ष्यांच्या संख्येत सातत्याने घट होत असून, आतापर्यंत 90 टक्के कमी झाल्याची नोंद आहे. इतकेच नव्हे तर, आयुसीएन या पक्षी संवर्धनविषयक काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने माळढोक पक्ष्यांचा समावेश सर्वाधिक धोक्यात असलेला पक्षी म्हणून घोषित केले आहे.
तणमोरांची घटती संख्या लक्षात घेत, वनविभागातर्फे वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूटच्या सहाय्याने राज्यात 2018 साली तणमोराच्या नोंदीसाठी विशेष सर्वेक्षण घेतले होते. यामध्ये पुण्यासह सोलापूर, वाशिम, अकोला आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश होता. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील सुमारे 25 रेंजेसमध्ये वनसुरक्षा रक्षकांच्या मदतीने हे सर्वेक्षण घेण्यात आले. यासाठी सुरक्षारक्षकांना विशेष प्रशिक्षणदेखील देण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये तणमोराची एकही नोंद झाली नाही, अशी माहिती वनविभाच्या वन्यजीव विभागाचे प्रमुख रमेशकुमार यांनी दिली.
का होतीये तणमोरांची संख्या कमी?
वाढत्या शहरीकरणात माळरान किंवा पडिक जमीन समजून त्याठिकाणी मोठमोठे रस्ते, महामार्ग अथवा विविध प्रकल्प उभारले जात आहेत. विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारामुळे आणि सातत्याने वाढत असलेल्या औद्योगिक वसाहतींमुळे राज्यातील गवताळ प्रदेश नष्ट होत आहेत. परिणामी गवताळ प्रदेश हा मुख्य अधिवास असलेल्या तणमोर आणि माळढोक प्रजातील सर्व पक्ष्यांचा अधिवास संकटात आला आहे. त्यामुळेच या पक्ष्यांची संख्या लक्षणीयरित्या खालावत आहे. या व्यतिरिक्त विजेच्या तारा, स्थानिक कुत्र्यांचा त्रासही यामागची प्रमुख कारणे असल्याचे अभ्यासकांकडून सांगितले जाते.





