तापकीर आणि मिसाळ यांचा सवाल-जवाब; महापालिकेत समाविष्ट गावांवर विधानसभेत प्रश्नोत्तरे

धनकवडी – पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांच्या विविध नागरी प्रश्नांवर खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर पर्वती मतदार संघाच्या आमदार तथा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी समर्पक उत्तरे दिली. मात्र, अनेक निर्णयांना विलंब होत असल्याची खंत आमदार तापकीर यांनी व्यक्त केली. शहरातील या दोन आमदारांचा सवाल-जवाब खरोखरच लक्षवेधी ठरला.
महापालिकेकडून सुविधा पुरविल्या जात नसताना समाविष्ट गावांतून दुप्पट मालमत्ता कर आकारला जातो, तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही नागरिकांना वाढीव बिल दिली जात असल्याचे तापरकीर यांनी निदर्शनास आणून दिले. यावर मंत्री मिसाळ यांनी नवीन कर चार्ट तयार करण्याचे निर्देश दिल्याचे आणि सक्तीची वसुली थांबविल्याचे असल्याचे सांगितले.
करोना काळात काम केलेल्या ग्रामपंचायत कामगारांना महापालिकेत सामावून घेतले नसल्याचेही तापकीर यांनी सांगताच यावर विभागीय चौकशी समितीचा अहवाल मिळाल्यानंतर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केले. तसेच, अतिवृष्टीमुळे पडलेल्या सीमाभिंतींच्या कामांसाठी ३० कोटींच्या निधीतून फेरनिविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याचेही याशिवाय जलपुरवठा योजनेसाठी ११ गावांकरिता ६०० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे असून नगरोत्थान योजनेंतर्गत त्यावर विचार होईल, असेही मंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केले.
पुणे महापालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या संस्थांची माहिती सभागृहात ठेवण्याची मागणीही आमदार तापकीर यांनी केली. एकूणच, मंत्री मिसाळ यांनी काही मुद्द्यांवर उत्तरे दिली असली तरी, समाविष्ट गावांच्या प्रश्नांवर निर्णय प्रक्रिया संथगतीने होत असल्याने नागरिक त्रस्त असल्याचे आमदार तापकीर यांनी म्हटले आहे.





