पोलीस कर्मचाऱ्यांची झाली गुणवत्ता परीक्षा

इस्लामपूर (प्रतिनिधी) : सेवेत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे कायदेविषयक ज्ञान अजमावून घेण्यासाठी इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी आज शुक्रवारी पोलिसांचीच परीक्षा घेतली. कमी गुणवत्ता असणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिफ्रेश कोर्स करावा लागणार आहे. तर गुणवत्ता धारकांना रिवॉर्डची शिफारस करण्यात येणार आहे. आज शनीवारी सकाळी सर्व पोलीस कर्मचारी कायद्याची पुस्तके हातात घेऊन विद्यार्थ्यांच्या भूमिकेत होते.
इस्लामपूर पोलीस ठाण्याचे वार्षिक तपासणीचे पार्श्वभूमीवर पोलीस अमलदारांची कायदेविषयक १०० गुणांची परीक्षा झाली. भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, भारतीय पुरावा कायदा याबाबत प्रश्नांची परीक्षा झाली. याबाबत पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे म्हणाले,” व्यावसायिक अभियोग्यता वृद्धिंगत होऊन सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पोलीस सेवा मिळावी यासाठी ही परीक्षा घेतली गेली.
उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे वार्षिक तपासणीचे पार्श्वभूमीवर इस्लामपूर पोलीस ठाण्यातील पोलीस अमलदारांसाठी निर्मला सांस्कृतिक हॉल येथे परीक्षेचे आयोजन करणेत आले होते. या परीक्षेसाठी 50 पोलीस अंमलदार बसले होते. या परीक्षेत प्रथम तिघा गुणवत्ता धारकांना १ हजार, सातशे व पाचशे रुपये व प्रशस्तीपत्रक देणेबाबत पोलीस अधीक्षक सांगली यांना विनंती केली जाणार आहे. या माध्यमातून कायद्यातील नवनवीन बाबी, कायद्यातील दुरुस्त्या पोलीस अंमलदार यांना अवगत होतील व पोलिसी कामकाजात सकारात्मक बदल होऊ शकतो. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी नियोजन केले.




