मुंबई : मंत्री नितेश राणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करण्याच्या कट कारस्थानातील एक भाग असल्याचा आरोप राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केला आहे. नीतेश राणे मुद्दाम देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन वादग्रस्त विधान करतात. यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होते. त्यांच्याविरोधात आयोगाकडे एक-दोन नव्हे तर तब्बल 40 तक्रारी आल्यात, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारने व्हर्च्युअल ईद साजरी करण्याचा कायदा केला, तर त्याचे पालन करण्याचा टोलाही राणेंना लगावला. खान म्हणाले की, नीतेश राणे वारंवार देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन बोलतात. ते महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय मुस्लिम ईमानदार, तर पाकमध्ये गेलेले बेईमान आहेत. महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायद्याचे पालन व्हावे असे आम्हालाही वाटते. पण बकऱ्यामु्ळे अनेकांना रोजगार मिळतो. त्यामुळे त्याच्या बळीवर बंदी घातल्यास हिंदू – मुस्लिम या दोन्ही समाजावर अन्याय होईल. राज्यात ज्या दिवशी व्हर्च्युअल ईद साजरी करण्याचा कायदा अस्तित्वात येईल, त्यादिवशी व्हर्च्युअल ईद साजरी केली जाईल. सध्या जो कायदा अस्तित्वात आहे, त्यानुसार ईद साजरी केली जात आहे. गो हत्या बंदी आहे, तो कायदा आहे. त्याचे पालन व्हायलाच पाहिजे, असे ते म्हणाले.