मॉस्को : रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी युक्रेन समोर चर्चा पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तुर्कीयेची राजधानी इस्तंबुलमध्ये कोणत्ही पुर्वअटीशिवाय ही चर्चा व्हावी, असे पुतीन यांनी म्हटले आहे. आज पहाटेच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना पुतीन यांनी रशिया आणि युक्रेन दरम्यान २०२२ मध्ये सुरू झालेली शांतता प्रक्रियेची चर्चा पुन्हा सुरू करण्याचा हा प्रस्ताव मांडला. युरोपातल्या ४ प्रमुख देशांच्या नेत्यांनी कालच युक्रेनमध्ये जाऊन युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे. पुतीन यांना ३० दिवसांच्या युद्धबंदीच्या प्रस्तावाबाबत राजी करण्यासाठी जोरदार दबाव आणण्याचा इशारा या नेत्यांनी दिला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुतीन यांनी युक्रेनसमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी आणि पोलंडच्या नेत्यांनी युक्रेनला दिलेल्या पाठिंब्याला अमेरिकेचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांचाही पाठिंबा असल्याचे नमूद केले होते. पुतीन यांनी शनिवारी त्यांच्या भाषणात या ताज्या युद्धबंदी प्रस्तावावर थेट चर्चा केली नाही. तरीही चर्चेच्या मुद्द्यावर रशियाला विचार करावा लागेल, असे शनिवारी क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पुतीन यांच्या या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिल्यची माहिती मिळते आहे. / युद्धबंदीमुळे युद्ध कायमचे थांबवण्यासाठी कालावधी मिळू शकेल, असे झेलेन्स्की यांनी युरोपातल्या ४ देशांच्या नेत्यांबरोबर मिळून प्रसिद्धीस दिलेल्या एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे.दुसऱ्या महायुद्धात जर्मनीवरच्या विजयाला ८० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने पुतीन यांनी ३ दिवसांची एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली होती. युक्रेनच्या सैन्याकडून मात्र या युद्धबंदीचे वारंवार उल्लंघन झाले होते. मार्च महिन्यात अमेरिकेने ३० दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला होता. युक्रेनने हा प्रस्ताव स्वीकारला होता, पण रशियाने प्रस्ताव नाकारला होता.