Santosh Bangar : शेळ्यांना बाजूला करा, वाघांना पुढे आणा! संतोष बांगरांनी आपल्याच मंत्र्यांंवर डागली तोफ; म्हणाले “2029 मध्ये…”
Santosh Bangar : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हिंगोली येथे झालेल्या सभेत त्यांनी पक्षातील काही मंत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत घरचा आहेर दिला.

Santosh Bangar : शिवसेनेतील अनेक मंत्री आता म्हातारे झाले असून त्यांना बाजूला करून नव्या दमाच्या वाघांना पुढे आणण्याची गरज आहे. तरच २०२९ मध्ये एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी जोरदार राजकीय डरकाळी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी फोडली. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हिंगोली येथे झालेल्या सभेत त्यांनी पक्षातील काही मंत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत घरचा आहेर दिला.
“अनेक मंत्री घोड्यावरून शेळ्या हाकत आहेत. फोन केला तरी रिप्लाय देत नाहीत. काही मंत्री पक्ष कमजोर करण्याचं काम करत आहेत. लोकांमध्ये जातात, पण काम काहीच करत नाहीत,” अशी टीका बांगर यांनी केली. मंत्री प्रकाश आबिटकर यांचे उदाहरण देत “त्यांना कधीही फोन केला तर ते उचलतात आणि समस्या ऐकून घेतात,” असेही त्यांनी सांगितले.
अंतर्गत नाराजीची चर्चा
यावेळी त्यांनी काही मंत्र्यांवर थेट निशाणा साधत, “अनेक मंत्री म्हातारे झाले आहेत. त्यांना ऐकू येत नाही. त्यांना पदावरून बाजूला करा. या शेळ्यांमागे वाघ दडले आहेत, त्यांना पुढे करा,” असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे शिवसेनेतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
..तेव्हा महायुतीचं सरकार बसलं
या सभेत बोलताना संतोष बांगर म्हणाले “महायुतीचे सरकार कुणामुळे आला असेल तर शिंदे साहेबांमुळे आले. साहेब चेहरा शिंदे साहेबांचा होता. शिंदे साहेबांमुळे लाडक्या बहिणींची दिवाळी आणि रक्षाबंधन साजरी झाली. तेव्हा महाराष्ट्रात महायुतीचं सरकार बसलं.”
दरम्यान, या सभेत उबाठा गटातील खासदारांच्या संभाव्य प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट उत्तर देणे टाळले. मात्र मराठवाड्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी पक्ष काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महायुतीतील जागावाटपाबाबत बोलताना, ज्या मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत त्या जागांवर आमचाच दावा कायम राहणार असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. अंतिम निर्णय महायुतीतील वरिष्ठ नेते येत्या एक-दोन दिवसांत घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. परभणी-हिंगोली विधान परिषद मतदारसंघात महायुती योग्य उमेदवार देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.





