अखेर वडोली निळेश्वरच्या ग्रामसेविका पुष्पा कोळी निलंबित

यशवंतनगर – कामकाजातील अनियमितता, हलगर्जीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वडोली निळेश्वर ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती पुष्पा नथुराम कोळी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आले.
अक्षय अरविंद डुबल, अविनाश सुरेश डुबल आणि इतरांनी श्रीमती कोळी यांच्याविरुद्ध कराड पंचायत समिती कार्यालयाकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. यामध्ये बोगस ग्रामसभा ठरावाद्वारे घरकुले अपात्र करणे, खोट्या ग्रामसभा घेणे, २०१७ पासूनचा मागासवर्गीय १५ टक्के निधी खर्च न करणे, ग्रामपंचायत कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे न बसवणे, बायोमेट्रिक हजेरी नसणे, मागासवर्गीय समाजाच्या शौचालयाची दुरुस्ती न करणे, समाजकल्याण विभागाचा ८ लाख ४५ हजार ८३१ रुपये निधीचा गैरवापर, वॉटर एटीएमच्या उत्पन्नाची माहिती न देणे, गावठाणातील रस्त्याचे कॉंक्रिटीकरण, स्ट्रीट लाइट/हायमास्ट कनेक्शन आणि कर्मचाऱ्यांचे २० महिन्यांचे वेतन तसेच ठेकेदारांची बिले थकवणे यासारख्या तक्रारींचा समावेश आहे.
याबाबत ग्रामस्थांनी १५ एप्रिलपासून केलेल धरणे आंदोलन आमदार मनोज घोरपडे यांच्या शिष्टाईनंतर स्थगित करण्यात आले होते. कराड पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार श्रीमती कोळी यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट न देता काही घरकुले कच्ची असताना अपात्र केल्याचे आढळले. यापूर्वी त्यांची एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई झाली होती. मात्र, सातत्यपूर्ण हलगर्जीपणामुळे ग्रामपंचायतीचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले.
चौकशी पूर्ण होईपर्यंत श्रीमती कोळी यांना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. मुख्यालय पंचायत समिती कोरेगाव येथे निश्चित करण्यात आले आहे. या आदेशाची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आमदार मनोज घोरपडे यांनी वडोली निळेश्वर ग्रामस्थांची भेट घेऊन आंदोलन स्थगित करण्यासाठी शिष्टाई केली. त्यावेळी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांना आंदोलन स्थळावरूनच कारवाई करण्याबाबत सूचना केली होती.
दैनिक प्रभातचा प्रभाव –
दैनिक ‘प्रभात’ने आपल्या वार्तांकनाद्वारे ग्रामस्थांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम सातत्याने केले होते. बोगस ग्रामसभा ठरावाद्वारे घरकुले अपात्र करणे, खोट्या ग्रामसभा घेणे, २०१७ पासूनचा मागासवर्गीय १५ टक्के निधी खर्च न करणे यांसारख्या तक्रारींना दैनिक प्रभातने वाचा फोडण्याचे काम करत पाठपुरावा केला. ग्रामसेविका पुष्पा कोळी यांच्या निलंबनानंतर ग्रामस्थांकडून दै. प्रभातच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.





