IAS Praveen Puri : मतिमंद शाळेतील गैरप्रकारावरून IAS प्रविण पुरी यांचे सभापतींकडून निलंबन

मुंबई : नागपूरच्या गुलशननगर येथील दी मातोश्री शोभाताई भाकरे मतिमंद मुला-मुलींच्या निवासी शाळेतील गैरप्रकारांचा मुद्दा विधान परिषदेत गाजला. भाजप आमदार संदीप जोशी यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडून दिव्यांग आयुक्त प्रविण पुरी यांच्यावर कारवाईची मागणी केली. सभापती राम शिंदे यांनी आक्रमक आमदारांचा पवित्रा पाहून पुरी यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवून निलंबनाचे आदेश दिले.
या शाळेत गेल्या १०-१५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या २६ कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती आहे. संस्था चालक कर्ज फेडण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून दरमहा एक हजार रुपयांची मागणी करतात, तसेच कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावत असल्याची तक्रार आहे. आमदार जोशी यांनी शाळेवर प्रशासक नेमण्याची मागणी केली.
संस्था चालकांच्या अघोरी धोरणामुळे शिक्षक आणि कर्मचारी आत्महत्या करतील. हे होऊ नये म्हणून दिव्यांग आयुक्त प्रविण पुरी यांनी लक्ष द्यावी, अशी विनंती आम्ही केली. परंतु आमदारांचे सहा सहा फोन ते उचलत नाहीत. ते प्रतिसाद देत नाही. त्यांच्यावर शासन कारवाई करणार का? असा सवाल आमदार जोशी यांनी केला.
मंत्री अतुल सावे यांनी पुरी यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, परंतु भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, “IAS अधिकारी आमदारांचे फोन उचलत नसतील, तर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे काय होणार?” त्यांनीही पुरी यांच्यावर कारवाईची मागणी लावून धरली. अखेर, सभापती राम शिंदे यांनी सरकारला पुरी यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले.





