जांबुत : जांबुत (ता. शिरूर) ग्रामपंचायत मधून विभाजन झालेल्या शरदवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी पुष्पा गांजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आधीच्या काळात निवडून आलेल्या सरपंच हरिभाऊ सरोदे यांनी आपला राजीनामा सादर केल्यानंतर शुक्रवार (दि. १४) रोजी पार पडलेल्या निवड प्रक्रियेसाठी पुष्पा गांजे यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज आला होता. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र पोटकुले, व ग्राममहसूल अधिकारी रुपेश भोर, ग्रामसेवक पोपट शेलार यांनी काम पहिले. शरदवाडी (ता. शिरूर) येथील सामाजिक कार्यकर्ते पप्पू गांजे यांचे शरदवाडीसह परिसरात मोठे सामाजिक योगदान असल्याने ग्रामस्थांनी विश्वासूपणे त्यांच्या पत्नी पुष्पा गांजे यांचेकडे गावच्या प्रमुख पदांची सूत्रे दिली असुन येणाऱ्या काळात सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन गावच्या विकासासाठी आपण सकारात्मक भुमीका घेऊन मूलभूत विकासकामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांकडून त्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या निवडीबद्दल त्यांचे माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, अरुणा घोडे, सावित्रा थोरात, सरपंच दत्तात्रय जोरी, जानवी उचाळे, नवनाथ निचित, संतोष पिंगट, उपसरपंच बाबुराव जोरी यांचेसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व विकास सोसायटीचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. प्रसंगी लहू साबळे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार चैतन्य गांजे यांनी मानले.