Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या अडचणी काही थांबेना.! आता दिग्दर्शकांकडून इंडस्ट्री सोडण्याची इच्छा; नेमकं काय घडलं पाहा…

Pushpa 2 । Allu Arjun : अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ चित्रपट सुपरहिट ठरत आहे. एकीकडे असे चित्र असताना मागील काही दिवसांपासून अल्लू अर्जुनच्या संकटात वाढ होत असल्याचे दिसत आहे. पुष्पा २ च्या प्रीमियरच्या वेळी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेपासून हा सुपरस्टार वादात सापडला आहे.
संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेत्याला अटक करण्यात आली होती. मात्र त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. तरीही त्याला एक रात्र तुरुंगात मुक्काम करावा लागला होता. सध्या याप्रकरणी पोलिसांकडून अल्लू अर्जुनची कसून चौकशी होत आहे.
अशातच ‘पुष्पा 2’चे दिग्दर्शक सुकुमार यांनी चित्रपटसृष्टी सोडण्याचं वक्तव्य करून सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. हैदराबादमधील एका कार्यक्रमात सुकुमार यांना अशी एखादी गोष्टी, जी त्यांना सोडायची आहे.. त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “सिनेमा”. त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यावेळी सुकुमार यांचं उत्तर ऐकून बाजूलाच बसलेल्या अभिनेता रामचरणलाही आश्चर्याचा धक्का बसला. सुकुमार यांनी कधीच चित्रपट बनवणं सोडू नये असं म्हणत रामचरणने थेट त्यांच्या हातून माईक काढून घेतला. एकीकडे अल्लू अर्जुन कायदेशीर अडचणींना सामोरं जात असताना सुकुमार यांनी केलेल्या या वक्तव्याने सिनेरसिक नाराज झाल्याचं दिसून येत आहे.
अल्लू अर्जुनला पुन्हा पोलिसांनी समन्स बजावले
आता अल्लूला पुन्हा पोलिसांनी समन्स बजावले आहे. आज सकाळी 11 वाजता त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. यासाठी त्याला चिक्कडपल्ली पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार तो पोलिस स्टेशनच्या बाहेर त्याच्या कारमधून खाली उतरताना दिसला.
ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुष्पा 2 च्या प्रीमियर दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. 8 वर्षीय बालकाला डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले आहे.





